आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून परीक्षार्थीच्या भत्त्यांमध्ये वाढ! निवासी भत्ताही लवकरच वाढणार

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकने परीक्षार्थीच्या प्रवास भत्त्यात ७.५० रुपये वरून १२ रुपये प्रति किलोमीटर अशी वाढ केली आहे.

महेश बोकडे

नागपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकने परीक्षार्थीच्या प्रवास भत्त्यात ७.५० रुपये वरून १२ रुपये प्रति किलोमीटर अशी वाढ केली आहे. तर त्यांच्या हॉटेलमधील निवासी दैनिक भत्ताही वाढवण्याचे निश्चित केले. परंतु, हॉटेलमधील भत्त्याची अंमलबजावणी कालांतराने होणार आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अखत्यारित राज्यातील सर्वच शासकीय व खासगी वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी महाविद्यालय व रुग्णालये येतात. येथे परिचर्यासह इतरही वैद्यकीयशी संबंधित अनेक अभ्यासक्रम विद्यापीठ चालवते. त्याची परीक्षा विद्यापीठच घेते. परीक्षांमध्ये परीक्षार्थीची भूमिका महत्त्वाची असते. परंतु, परीक्षकांच्या मागणीकडे विद्यापीठाकडून सातत्याने दुर्लक्ष होत होते. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेने परीक्षार्थीच्या प्रश्नावर आवाज उचलत संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. समीर गोलावार यांनी आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांची भेट घेतली. त्यानंतर विद्यापीठाने परीक्षार्थीच्या प्रवसा भत्त्यात ७.५० रुपये प्रतिकिलोमीटरवरून १२ रुपये प्रतिकिलोमीटर अशी वाढ केली आहे.

हे वाचले का?  धार्मिक पर्यटन, उद्योग, व्यवसायांवर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून; नाशिक जिल्ह्यचा विकास दर १३.१ टक्के

परीक्षार्थीचा हॉटेलमध्ये राहण्यासाठी दैनिक भत्ताही मुंबईसारख्या ‘अ’ दर्जाच्या शहरात ५ हजार रुपये प्रतिदिवस करण्याला अनुकूलता दर्शवली. पूर्वी येथे प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांना ५ हजार रुपये भत्ता मिळत असला तरी सहाय्यक प्राध्यापकांना सुमारे २ हजार रुपयेच मिळत होते. दरम्यान, वैद्यकीय शिक्षक संघटनेने विद्यापीठाकडे नागपूरसारख्या ब दर्जाच्या शहरात ४ हजार रुपये प्रतिदिवस, ‘क’ दर्जाच्या शहरात ३ हजार रुपये भत्ता देण्याची मागणी केली आहे. प्रवास भत्ता वाढल्याच्या वृत्ताला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वित्त व लेखाअधिकारी नरहरी कळसकर यांनी दुजोरा दिला आहे.

हे वाचले का?  औद्योगिक विकासाला चालनेची गरज! आरोग्य, शिक्षणाच्या दृष्टीने प्रगती; जीवनमानातही सुधारणा

आरोग्य विद्यापीठाने परीक्षार्थीच्या प्रवास भत्त्यात वाढ केली. परंतु हॉटेलमधील निवासी भत्ता मुंबईचा वाढवला आहे. इतरही ठिकाणचे भत्ते तातडीने वाढवून वैद्यकीय शिक्षकांच्या इतरही मागण्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.- डॉ. समीर गोलावार, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना.