इस्रायलमधील ‘अल जझीरा’ची कार्यालये बंद ;नेतान्याहू सरकारचा कामकाज थांबवण्याचा आदेश; उपकरणेही जप्त

इस्रायलचे ‘अल जझीरा’शी फार पूर्वीपासून कठोर संबंध असून, त्यांच्याविरुद्ध पक्षपाताचा आरोप केला आहे.

तेल अविव, दोहा : इस्रायलने रविवारी ‘अल जझीरा’ उपग्रह वृत्तवाहिनीची स्थानिक कार्यालये बंद करण्याचा आदेश दिला. ‘अल जझीरा’ आणि इस्रायलमधील बिन्यामिन नेतान्याहू सरकारदरम्यान दीर्घकाळ तणाव होता. त्या पार्श्वभूमीवर आधी नेतान्याहू सरकारच्या मंत्रिमंडळाने ‘अल जझीरा’चे स्थानिक कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वाहिनीच्या कार्यालयावर छापा टाकून तिथे तपासणी करण्यात आली. त्यानंतर कार्यालय बंद करण्यात आले. वृत्तवाहिनीचे कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इस्रायली अधिकाऱ्यांनी जेरुसलेम येथील हॉटेलमध्ये थाटलेल्या ‘अल जझीरा’च्या कार्यालयात छापा टाकल्याचे इस्रायल आणि ‘रॉयटर्स’च्या सूत्रांनी सांगितले. सरकारच्या निर्णयामुळे इस्रायलचा ‘अल जझीरा’विरुद्ध दीर्घकाळ चाललेला संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हे वाचले का?  ५० वर्षांनंतर अमेरिका पुन्हा चंद्रावर पोहचली, यावेळी सहा पायांचे यान…

इस्रायलचे ‘अल जझीरा’शी फार पूर्वीपासून कठोर संबंध असून, त्यांच्याविरुद्ध पक्षपाताचा आरोप केला आहे. ‘अल जझीरा’ हे युद्धादरम्यान गाझामध्ये राहिलेल्या काही आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांपैकी एक असून, येथील हवाई हल्ले आणि रुग्णालयांमधील रक्तरंजित दृश्यांचे त्यांनी प्रसारण केले आहे. तसेच इस्त्राईलवर नरसंहार केल्याचा आरोपही केला आहे. दरम्यान, इस्रायलने ‘अल जझीरा’वर पॅलेस्टाईनची कट्टरवादी संघटना ‘हमास’शी सहकार्य केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत इस्रायलने गाझामधील युद्ध सुरू असेपर्यंत ‘अल जझीरा’चे प्रसारण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हा निर्णय म्हणजे गुन्हेगारी कृत्य असून, इस्रायली सुरक्षेला धोका असल्याचा केलेला दावा धोकादायक आणि तितकाच हास्यास्पद होता, अशी प्रतिक्रिया ‘अल जझीरा’कडून व्यक्त करण्यात आली आहे. सरकारच्या निर्णयानंतर इस्रायली टीव्ही वाहिन्यांनी ‘अल जझीरा’चे प्रसारण थांबवले.