चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा अनोखा ‘मग’संग्रह रसिकांसाठी खुला

दालनात वैशिष्टय़पूर्ण अडीच हजार ‘मग’

दालनात वैशिष्टय़पूर्ण अडीच हजार ‘मग’
नगर : प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी आपल्या छंदातून उभारलेले, देश-विदेशातील अनोखे अडीच हजार ‘मग’ संग्रह असलेले दालन आज, बुधवारी नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. शहरातील गुलमोहर रस्त्यावर असलेल्या कांबळे यांच्या स्टुडिओमध्ये हे दालन निर्माण करण्यात आले आहे. ‘मग’चा संग्रह असलेले व इतक्या मोठय़ा संख्येने संग्रह केलेले भारतातील हे कदाचित पहिलेच दालन असावे, असा दावा कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

कांबळे यांच्या या दालनामुळे नगर शहराच्या पर्यटन व्यवसायाला गती मिळेल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केली. राज्य सरकारच्या आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उद्य्ोजक नरेंद्र फिरोदिया, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, डॉ. रवींद्र साताळकर आदी या वेळी उपस्थित होते.

आपल्या संग्रहाविषयी माहिती देताना कांबळे यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी मुंबईला जगप्रसिद्ध कलाकार पाब्लो पिकासो यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो होतो, तिथे पिकासोची स्वाक्षरी असलेले ‘मग’ विक्रीसाठी ठेवले होते. पिकासोची आठवण म्हणून मी तो ‘मग’ विकत घेतला.

याच दरम्यान काळाघोडा फेस्टिव्हल सुरू होता. तेथे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कॅलिग्राफीचा स्टॉल होता तेथेही त्यांनी कॅलिग्राफीचे ‘मग’ ठेवले होते. त्यांच्याकडील १० ही ‘मग’ मी विकत घेतले. याच महोत्सवात सिरॅमिकचे ‘मग’ करणारे कलाकार भेटले. सुंदर कलाकृती मला पाहायला मिळाल्या. त्यातूनच मला अशा वैशिष्टय़पूर्ण ‘मग’चा संग्रह करण्याचा छंद जडला. मी कोठेही भटकंती करायला गेलो की तेथे कोठे चांगले ‘मग’ मिळतात का हे पाहायचो. यामुळे माझा संग्रह वाढत गेला.

धातू, सिरॅमिक, काच, टेरेकोटे, पत्रे, कागदी  ‘मग’ संग्रहात जमा झाले. आकारातही प्रचंड वैविध्य आहे. युरोप-अमेरिकेतूनही अनेक वैशिष्टय़पूर्ण ‘मग’ आणले.

माझ्या या छंदाची ख्याती मित्रमंडळीत पोहोचली. त्यामुळे माझे मित्रही कुठे वेगळे ‘मग’ दिसले की माझ्यासाठी ते घेऊ न येतात. जवळपास अडीच हजार ‘मग’चा ठेवा स्वतंत्र दालनाच्या माध्यमातून खुला करताना विशेष आनंद होत आहे, अशी भावनाही प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केली.

संग्रहाचे वैशिष्टय़

प्रमोद कांबळे यांच्या संग्रहात भारतरत्न सचिन तेंडुलकर, पंडित हरिप्रसाद चौरसिया, तबलानवाज झाकीर हुसेन, लेखक मंगेश तेंडुलकर, वकील उज्ज्वल निकम आदी प्रसिद्ध व्यक्तींनी स्वाक्षरी केलेले, १८८३ कोकाकोला कंपनीचा, प्रिन्स चार्ल्स व डायना यांच्या विवाहाप्रीत्यर्थ जे खास ‘मग’ तयार केले होते त्यापैकी एक, काही असे आहेत की, ज्यात गरम कॉफी टाकल्यावर त्याचा रंग बदलतो, काहीमध्ये गरम पेय टाकल्यावर संगीत सुरू होते, १ इंचापासून ते २० लिटर क्षमतेचे  ‘मग’ या ठिकाणी पाहायला मिळतील.