लाखो रुपये खर्च करून टोमॅटो लागवड केली असताना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.
नाशिक : जिल्ह्यात कांद्यापाठोपाठ गुरुवारी टोमॅटोचेही भाव घसरल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह दिंडोरी, कळवण येथे शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. निर्यातक्षम टोमॅटोला प्रतिकिलो चार रुपयांपर्यंत तर, लाल टोमॅटोला प्रति जाळी २० ते ८० रुपये भाव मिळाल्याने बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
लाखो रुपये खर्च करून टोमॅटो लागवड केली असताना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. निर्यातक्षम टोमॅटोला प्रती किलो चार रुपयांपर्यंत भाव आला आहे. अवकाळी पावसामुळे उदभवलेल्या संकटातून टोमॅटो पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी मेहनत घेतली. त्यातच आता कडक उन्हाळ्यामुळे टोमॅटो लाल होऊ लागल्याने बाजारात आवक वाढली आहे. परंतु, दरात कोणतीही सुधारणा नसल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे.
या विषयी दिंडोरी तालुक्यातील टोमॅटो उत्पादक किशोर मालसाने यांनी व्यथा मांडली. पंधरवड्यापूर्वी टोमॅटोला एका जाळीसाठी १५० ते १७० रुपये दर होता. चार दिवसांपूर्वी तो १०० वर आला. आज शेतापासून बाजार समितीपर्यंत माल आणण्यासाठी ५० रुपये खर्च आला. १५० जाळ्या माल बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. व्यापाऱ्यांनी प्रती किलो चार रुपये दराने माल देण्यास सांगितले. इतक्या कमी भावात माल आणण्याचा खर्चही निघत नाही. पुन्हा घरी नेण्यासाठी वेगळा खर्च. त्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकला, असे त्यांनी सांगितले. निगडोळ येथील किरण मालकाने यांच्यासह गावातील काही शेतकऱ्यांनी ७०० जाळ्या टोमॅटो आणला होता. एका जाळीत २० किलो टोमॅटो बसतात. सुरूवातीला व्यापाऱ्याने माल पाहून चार रुपये प्रतिकिलो दर ठरवला. ४० जाळ्या उतरविल्यावर तीन रुपये दर ठरविला. त्यानंतर दोन रुपयाने मागणी केल्यावर फुकटच घे, असे मालकाने यांनी सांगितल्यावर कोणीच जाळी उचलायला तयार झाले नाही. घरी नेण्यासाठीही पैसे जवळ नसल्याने रस्त्यावरच काही माल विकल्याचे त्यांनी सांगितले.
कांदा दरातही घसरण
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याच्या भावात गुरूवारी मोठी घसरण झाली. सरासरी ७०० रुपये क्विंटलवर असलेले भाव २०० रुपयांनी घसरून थेट ५०० रुपये क्विंटलपर्यंत आले. या दरामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने उत्पादक अडचणीत सापडला आहे. गुरूवारी मनमाड बाजार आवारात २८३ ट्रॅक्टर इतकी कांद्याची आवक झाली.१०० ते ९५३ सरासरी ५०० रुपये क्विंटल असा उन्हाळ कांद्याला भाव मिळाला. यापूर्वी ७०० ते ६५० रुपये क्विंटल असा भाव होता. दोन दिवसांत या भावात क्विंटलमागे सरासरी २०० रुपयांची घसरण झाली. मार्च आणि एप्रिल महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका कांदा पिकाला बसला. कांदा ओला झाल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले. शेतकर्याने लागवड केलेला उन्हाळ कांदा आणि भाव वाढतील या आशेने साठवणूक करून ठेवलेला उन्हाळ कांदा विक्रीसाठी बाजारात दाखल होऊ लागला. आवकही वाढू लागली. पण बाजारभाव मात्र अपेक्षित मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. कांद्याच्या सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत सरासरी दरात मात्र तशी स्थिती नव्हती. गुरूवारी बाजारात सुमारे २३ हजार क्विंटलची आवक झाली. त्याला किमान ३००, कमाल १२०१ तर सरासरी ७२५ रुपये दर मिळाला. या आठवड्यात दर ७०० ते ७२५ रुपयांच्या दरम्यान आहे.