भाविकांकडून तक्रारी आल्याने आणि वाद निर्माण झाल्याने मंदिर प्रशासनाने बदलला निर्णय
महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली एक देवी म्हणजे तुळजा भवानी. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिर संस्थानाच्या वतीने एक नियमावली जाहीर केली गेली होती. अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडा परिधान करणाऱ्या नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे फलक मंदिर परिसरात लावले आहेत. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं भान ठेवा. मात्र यावरुन वाद सुरु झाला. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये स्पष्टीकरण देत असा कुठलाही ड्रेसकोड मंदिरात येण्यासाठी नसल्याचं मंदिर समितीने म्हटलं आहे.
जाहीर प्रकटनात काय म्हटलं आहे?
मंदिरातील सर्व महंत, पुजारी, सेवेदारी आणि भाविक तसंच भक्तांना कळवण्यात येते की, श्री तुळजा भवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी.
तुळजाभवानी मंदीर परिसरात दिवसभर झळकलेल्या फलकांवरून गहजब माजला होता. त्यामुळे सायंकाळी मंदिर संस्थानाचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी याबाबतचे जाहीर प्रकटन काढले आहे. तुळजाभवानी मंदिरात दर्शन अथवा पूजेसाठी येणाऱ्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण या अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
मंदिर परिसरात अचानक ड्रेसकोडबाबतचे फलक झळकल्याने भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र यावरुन वाद निर्माण झाल्याने मंदिर प्रशासाने अवघ्या काही तासांमध्ये आपली भूमिका बदलली आहे. तसंच भाविकांवर आणि भक्तांवर कुठलेही निर्बंध नाहीत असं म्हटलं आहे.