नाशिकच्या जागेवर भाजपचा पुन्हा दावा

नाशिक लोकसभा मतदारसंघ आपण तीन वर्षांपासून पिंजून काढला असून विविध माध्यमांतून जनतेशी संपर्क राखल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

नाशिक : नाशिक लोकसभेची जागा भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षाला मिळणे म्हणजे पराभवाला निमंत्रण देण्यासारखे ठरेल. ही गोष्ट भाजपच्या ४०० पार नाऱ्यासाठी अडचणीची ठरणार आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत नाशिकची जागा भाजपला सोडण्यात यावी, ही समस्त लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची मागणी असल्याचा दावा भाजपचे माजी महापालिका सभागृह नेते व उमेदवारीसाठी इच्छुक दिनकर पाटील यांनी केला आहे.  नाशिकच्या जागेवरून महायुतीत तीनही पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण झाले. निर्णय घेण्यास विलंब झाल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माघार घेतली. त्यामुळे ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात असताना भाजपने पुन्हा एकदा या जागेवर दावा केला आहे.

हे वाचले का?  अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा

सध्याची राजकीय परिस्थिती ही इतर कुठल्याही पक्षापेक्षा भाजपला अधिक अनुकूल आहे. नाशिक महानगरपालिका व त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत सत्ता, मतदारसंघातील संघटन आदींच्या बळावर सर्व आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी महायुतीत ही जागा भाजपला सोडविण्याची मागणी लावून धरली. विविध सर्वेक्षणांत भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो हे समोर आल्याचे दाखले दिले जात आहेत. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांच्या प्रती नकारात्मक भावना आहे. त्यांच्या गैरकारभारामुळे जनमानसातील प्रचंड नाराजीचे रूपांतर मतदानात होईल. नाशिक लोकसभा मतदारसंघ आपण तीन वर्षांपासून पिंजून काढला असून विविध माध्यमांतून जनतेशी संपर्क राखल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.https://www.loksatta.com/quiz/embedded-quiz/30?embedded=1

हे वाचले का?  नाशिक : कपालेश्वर मंदिराजवळील रस्त्यांवर वाहतूक बंद

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवाराची घोषणा करण्यात बराच विलंब झाल्यामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. महायुतीत निर्णय होईपर्यंत भाजपचा या जागेवर दावा कायम राहणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सांगितले. भाजपकडून नियमित मतदान केंद्रस्तरीय कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. निर्णयास विलंबाचा मुद्दा भाजपचे नाशिक लोकसभा प्रभारी केदा आहेर यांनी अलीकडेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडल्याचे सांगितले जाते.