नाशिक जिल्हा वाहतूक संघटनेच्या वतीने आयोजित चार दिवसीय ऑटो अँड लॉजिस्टिक प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांच्या हस्ते होणार आहे.
नाशिक – नाशिकची वाटचाल देशाच्या रसद (लाॅजिस्टिक) केंद्राकडे सुरू असून त्यास बळ देण्यासाठी नाशिक जिल्हा वाहतूक संघटनेच्या वतीने आयोजित चार दिवसीय ऑटो अँड लॉजिस्टिक प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांच्या हस्ते होणार आहे.
ठक्कर डोम येथे सायंकाळी पाच वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी पालकमंत्री, खासदार, आमदारांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वाहतूक उद्योगात ५० वर्षे सेवा देणारे चालक किसन पवार, मेहबूब पठाण या वाहकांनाही उद्घाटनाचा मान दिला जाईल, अशी माहिती नाशिक जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र (नाना) फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम. सैनी यांनी दिली. दरम्यान, नाशिक जिल्हा वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रदर्शनात सायकलपासून ते अवाढव्य जेसीबी, ट्रेलरदेखील पहायला मिळेल. एकप्रकारे वाहतूक व्यवसायाचा इतिहास ते भविष्य असा प्रवास उलगडला जाईल. गुरुवारी उद्घाटनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी राहणार आहे. त्यात विविध राज्यांतील कलांचे सादरीकरण केले जाईल.
शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर त्यांच्या हस्ते ‘कोशिषे कामयाबी की’ पुरस्कार वितरण सोहळा होईल. त्यात ५० वर्षांपासून वाहतूक व्यवसायात काम करणाऱ्या वाहकांचा तसेच वाहतूक क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांचा सन्मान मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते केला जाईल. त्याअगोदर दुपारी तीन वाजता मालमोटार चालक आणि त्यांच्या पत्नी यांच्यासाठी ‘होम मिनिस्टर’ या मजेशीर खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी दुपारी दोन वाजता लिट्ल वंडर या वाद्यवृंदाचा तर, सायंकाळी सहा वाजता चलती का नाम गाडी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी दुपारी तीन वाजता ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. सायंकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनाचा समारोप होईल. नाशिककरांनी या प्रदर्शनाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
प्रदर्शन माध्यमातून वाहतूक क्षेत्रातील सर्व घटकांना एकत्र आणत चालकांसाठी सर्व सुविधायुक्त विश्रांतीगृह (सारथी सुविधा केंद्र) उभारण्याचा संस्थेचा उद्देश आहे. मार्च महिन्यात संस्थेतर्फे आयोजित ‘ऑटो अँड लॉजिस्टिक समिट’ला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या उपस्थितीत प्रस्तावित सारथी केंद्राचे सादरीकरण झाले होते.
पाककला महोत्सव आकर्षण
प्रदर्शनात देशभरातील पाककलांचा समावेश असलेले ‘एक देश अनेक व्यंजन’ हा महोत्सव होणार असून ते एक मुख्य आकर्षण असणार आहे. चारही दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे.
दळणवळण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने वाहतूक क्षेत्र अतिशय गतिशील पद्धतीने बदलत आहे. त्यामध्ये असलेल्या नावीन्यपूर्ण संधी व तंत्रज्ञान त्या अनुषंगाने वाहतूक व्यावसायिकानी करावयाचे बदल तसेच सारथी सुविधा केंद्राची निर्मिती हा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. – राजेंद्र (नाना) फड (अध्यक्ष, नाशिक जिल्हा वाहतूक संघटना)