नाशिक: मुख्यमंत्री मार्गस्थ अन् वीज गायब

मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा मार्गस्थ होत असतानाच प्रबोधिनीतील वीज पुरवठा खंडित झाला.

३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतून मुख्यमंत्री मार्गस्थ झाल्यानंतर प्रबोधिनी परिसरात अंधार पसरला.

पोलीस महासंचालक आणि आयोजक समितीच्यावतीने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी त्र्यंबक रस्त्यावरील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील मैदानावर झाले. हा कार्यक्रम संपेपर्यंत अंधार पडला होता. मैदानालगत असणाऱ्या विशेष दालनात मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी लहान मुलांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिंदे यांनी स्वत: लहान मुलांना केक भरवला. पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांना केक भरवला. प्रसारमाध्यमांशी संवाद न साधता मुख्यमंत्री निघाले.

हे वाचले का?  रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध

मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा मार्गस्थ होत असतानाच प्रबोधिनीतील वीज पुरवठा खंडित झाला. प्रबोधिनी परिसरात अंधार पसरलेला होता. जवळपास २० मिनिटे वीज पुरवठा बंद होता. प्रबोधिनीतील मुख्य इमारतीत जनरेटरची व्यवस्था आहे. मैदानातील काही दिवे बॅटरीवर सुरू होते. परंतु, इतरत्र तशी कुठलीही व्यवस्था नसल्याने परिसरात अंधार दाटला होता. मुख्यमंत्री कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडल्यानंतर हा प्रकार घडल्याने उपस्थितांचा जीव भांड्यात पडला.