महापालिका निवडणुकीच्या प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) प्रभाव निर्माण केला आहे. उमेदवारांना प्रचाराला वेळ कमी मिळाल्यामुळे समाजमाध्यमी प्रचारावर जोर देण्यासाठी उमेदवारांकडून ‘एआय’चा वापर केला जात आहे. ‘एआय’च्या सहाय्याने दृकश्राव्य प्रचार साहित्यनिर्मिती, भावनात्मक विश्लेषण (सेन्टिमेंट ॲनालिसिस), ‘एआय चॅटबॉट’सारख्या विविध साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
गेल्या काही वर्षांत राजकीय क्षेत्रात समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातूनच ‘वॉर रूम’सारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत. आता बदलते तंत्रज्ञान स्वीकारून राजकीय पक्ष, उमेदवारांकडून या तंत्रज्ञानाचा प्रचारासाठी कौशल्याने वापर केला जात आहे. त्यामुळेच समाजमाध्यमांसह आता ‘एआय’चा वापरही करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्यापासून मतदानापर्यंत उमेदवारांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्याने उपलब्ध वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘एआय’ची मदत घेतली जात आहे.
एआय तज्ज्ञ डॉ. अमेय पांगारकर म्हणाले, ‘सध्याच्या रील्सच्या काळात उमेदवारांकडून प्राधान्याने रील्सवर भर दिला जात आहे. विरोधी उमेदवारांना लक्ष्य करण्यासाठीच्या चित्रफिती तयार केल्या जात आहेत. मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी एआय चॅटबॉट, प्रचारगीते, समाजमाध्यमांतील जाहिराती, विश्लेषणासाठीची आशयनिर्मिती, भावनात्मक विश्लेषणासाठी ‘एआय’चा वापर करण्यात येत आहे. कमी वेळात जास्तीत जास्त प्रचार साहित्य तयार करण्यासाठी एआय उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे दिवसाला समाजमाध्यमांत २० पोस्ट, अनेक रील्स करणे शक्य झाल्याचे दिसते. त्याशिवाय, ‘एआय’च्या वापरामुळे तुलनेने खर्चातही बचत झाली आहे.’
‘एआय’चा जितक्या परिणामकारकतेने वापर केला जाऊ शकतो, तितका तो होत असल्याचे जाणवत नाही. ‘होर्डिंग’ डिझाइन करण्यासाठी ‘एआय’ वापरले जात असल्याचे दिसलेले नाही. ‘एआय’चा वापर स्टोरी टेलिंगसाठी केल्यास ते जास्त प्रभावी होऊ शकते. आपण काय काम करणार आहोत हे दाखवण्यासाठी ‘एआय’ वापरून चित्रफिती निर्माण केल्यामुळे कल्पनाशक्ती वाढल्याचे दिसते. या चित्रफितीतून काय करता येऊ शकते हे दाखवण्याचा प्रयत्न आहे,’ असे निरीक्षण जाहिरातज्ज्ञ ऋग्वेद देशपांडे यांनी नोंदवले. ‘एआय’च्या वापरासंदर्भात आता अनेक जाणकार निर्माण होत असल्याने या क्षेत्रात नवीन शाखा निर्माण झाल्यासारखे चित्र आहे. त्यामुळे कामाच्या स्वरुपात काही प्रमाणात बदल झाला आहे किंवा कामाला थोडी वेगळी दिशा मिळाली आहे, असेही देशपांडे यांनी नमूद केले.



