राजकीय गुन्हेगारीला धक्का!

राजकीय गुन्हेगारीला धक्का!
( वाचण्यासाठी लागणारा वेळ अदमासे 4 मिनिट )

राजकारण करता करता गुन्हेगारांना ‘राजाश्रय’ देणाऱ्या नाशिकमधील सत्ताधारी भाजप व अनेक विरोधी पक्षातील नेते, पदाधिकारी व समर्थक शहर पोलिसांनी ‘लक्ष्यावर’ घेतले आहेत. गुन्हे नोंद, गुन्हेगारी पार्श्वभूमी, विविधांगी गंभीर तक्रारी पडताळून या गुंडांसह त्यांची ‘पाठराखण’ करणाऱ्या नेत्यांना वठणीवर आणण्यासाठी ‘गुन्हेस्त्र व अटकस्त्र’ राबविले जात असून सातपूर गोळीबारात रिपाइं पदाधिकारी व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याला टोळीप्रमुख केल्यावर रामवाडी गोळीबार प्रकरणात भाजप नेत्याला टोळीप्रमुख का करण्यात आले नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ‘बागुल गँग’च्या अडचणी वाढणार आहेत.

शहरात मागील दहा महिन्यांत खुनाच्या ४६ तर गोळीबाराच्या पाचहून अधिक घटना घडल्याने शहर हादरले आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘धाक’च नसल्याने रस्त्यावरील जबरी लूट, चोरी, हाणामारी, गोळीबार, घरफोडी व अन्य गंभीर घटना वाढल्याने पोलिसांवर ‘चौफेर’ टीकेची झोड उठली. गुन्हेगार व त्यांना राजाश्रय देणारे ‘नामानिराळे’च राहिल्याने टीकेची ही झोड अधिक धारदार झाली. अखेर पोलीस आयुक्तालयाने शहरात घडलेल्या ‘गुन्हेगारी’चा सर्वंकष आढावा घेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये घडलेल्या धोत्रे हत्याकांड व सागर जाधव गोळीबार प्रकरणात सत्ताधारी भाजपशी निगडीत पदाधिकारी उद्धव निमसे व माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना रडारवर घेत थेट अटक केली.

See also  पाकिस्तान अणुचाचणी करत आहे का?

यानंतर, ‘गुन्हेगारीमुक्त नाशिक’ साठी तडीपारी, प्रतिबंधात्मक कारवाया वाढवून ढेपाळलेल्या पोलीस ठाण्यांचा कारभार सुरळीत करण्यासाठी बारा पोलीस ठाणे प्रभारींची खांदेपालट केली. तर, गुन्हे उकलीसाठी गुन्हेशाखेतर्गत अंबड व नाशिकरोड अशा दोन गुन्हेशाखा विस्तारून युनिट दोनला अधिक मनुष्यबळ देण्यात आले. त्यातच, दोन महिन्यांत दहा खून व गोळीबाराच्या एका पाठोपाठ तीन घटना घडल्याने पोलिसांनी सखोल तपास केला. त्यात, सातपूर हा ‘आपलाच’ बालेकिल्ला समजणारे ‘पीएल’ ग्रुपचे संस्थापक प्रकाश लोंढे व त्यांचे ‘आख्खे कुंटुंब’ च पोलीस दप्तरी संशयित करण्यात आले. याच कालावधीत ‘बायजा बाईंची छावणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामवाडी ते विसेमळा मार्गावर सचिन साळुंकेवरील अंदाधुंद गोळीबारानंतर भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागुल व साथीदारांचा सहभाग निष्पन्न करुन गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ‘सेफसाईड’ म्हणून हे गुन्हे व कारवाया केल्या जात असल्याचा आरोपही केला जात आहे.

बेकायदेशिरपणे बॅनरबाजी करुन सामांन्यांच्या मनात भीती निर्माण केल्याबाबत पोलिसांनी जेलरोड येथील माजी प्रभाग सभापती पवन पवार, सातपूर येथील माजी नगरसेविका दीक्षा दीपक लोंढे, तसेच प्रकाश लोंढे, दीपक, भूषण लोंढेसह अमोल पगारे, दिगंबर पगारे व दीपक उबाळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

See also  राजू शेट्टी - “आम्ही काय भिकारी आहोत का?”

स्वार्थासह वर्चस्वासाठी गुन्हेगारी व राजकारण ‘मिक्स’ करुन दुकानदारी चालविणारे आता रडारवर आहेत. आयुक्तांनी भाजपचे जगदीश पाटील, उद्धव निमसे, अजय बागूलसह सराईत गुंड गण्या कावळे, कुंदन परदेशी, भूषण लोंढे, दीपक लोंढे, राकेश कोष्टी व इतरांना छोटा मोठा ‘दणका’ दिला असतानाच पुढील लॉटमध्ये अनेकांचा सहभाग उघड होणार आहे. येत्या काही दिवसांत सिडकोतील मुकेश शहाणेसह त्यांचे पंटर, तसेच रम्मी राजपूत, विक्रम नागरे, व्यंकटेश मोरे, पवन पवार, अर्जुन पगारे, गण्या कावळे, योगेश शेवरे आदी ३० हून अधिक छोट्या मोठ्या सराईतांवर पोलिसांची लवकरच ‘वक्रदृष्टी’ पडण्याची शक्यता आहे.