बालपणापासून देशभक्ती, युद्धनितीचे धडे देण्याची गरज ; भोसला सैनिकी विद्यालयातील कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे प्रतिपादन

राज्यपाल कोश्यारी यांनी वेद, अस्र, शस्र आणि शास्त्र भारतात अनादी काळापासून नांदत असल्याचे सांगितले.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश संरक्षणदृष्टय़ा आत्मनिर्भर होत आहे. आपल्या शस्र आणि अस्रांची निर्मिती देशातच करण्याच्या संकल्पनेतून १०० सैनिकी शाळा देशात निर्माण केल्या जाणार आहेत. बालपणापासून देशभक्ती आणि शस्र चालविण्याचे आणि युद्धनितीचे धडे भारतीयांना मिळाल्यास भविष्यात कुणीही जवान शहीद होणार नाही, असा विश्वास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केला.

येथील भोसला सैनिकी विद्यालयाच्या ८५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोश्यारी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सहायक जिल्हाधिकारी वर्षां

हे वाचले का?  कॉलेज रोडवरील दरोड्यामागे बांधकाम व्यावसायिक सूत्रधार; गुंडांकडून वृध्द दाम्पत्यास मारहाण

मीना, मध्यवर्ती हिंदूसैनिकी शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, संस्थेचे विभागीय अध्यक्ष कॅप्टन एस. जी. नरवणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी यांनी वेद, अस्र, शस्र आणि शास्त्र भारतात अनादी काळापासून नांदत असल्याचे सांगितले.

भारतीय जेवढे पूजेसाठी शांत असतो, तेवढेच क्रांतीसाठीही शस्रसज्ज असतो, त्यामुळे पूजेतील शांती आणि शस्रातील क्रांती ही भारतीयांची खरी ओळख आहे. भारतीयांच्या सर्वागीण संस्कृतीला दडपण्याचा प्रयत्न ब्रिटीशांनी केला. भारतीयांचे ज्ञान, विज्ञान आणि बुद्धीमत्तेला नेहमीच कमकुवत करण्याचे आणि तसे बिंबवण्याचे प्रयत्न इंग्रजांनी वेळोवेळी केले. परंतु आपली संघर्षांची आणि विजयाची परंपरा रावणाच्या पराभवापासून सुरू होते आणि ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त होईपर्यंत राहिली. ती आजही कायम आहे.

हे वाचले का?  नाशिकमध्ये पावसाने ५१३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

आमची शस्र परंपरा आणि अस्रांची शक्ती अनादी आहे, शाश्वत आहे. आमच्या देव-देवताही शस्रधारी आहेत. मुली सैनिकी शिक्षणातून माता दुर्गा बनून दृष्टांचा, शत्रुंचा विनाश करण्यासाठी पुढे येतील, असा विश्वासही कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला.

कोश्यारी यांनी संस्थेस त्यांच्या अधिकारात असलेल्या फंडातून २५ लाख रुपयांची देणगीही यावेळी जाहीर केली. यावेळी प्रास्ताविकातून संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती महासचिव दिलीप बेळगांवकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांच्या विविध दलांनी संचलन आणि थरारक प्रात्यक्षिकांमधून उपस्थितांची मने जिंकली.