‘रामलल्लाच्या तीन आरत्यांसाठी आता पास अनिवार्य आणि…’, अयोध्येच्या मंदिरात जाणाऱ्या भक्तांसाठी नवी नियमावली

नव्या नियमावलीत काय काय नियम आहेत जाणून घ्या

२२ जानेवारी या दिवशी मोठ्या थाटात राम मंदिरात रामाच्या बालरुप मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यानंतर २३ जानेवारीपासून भक्तांसाठी मंदिर खुलं झालं आहे. मंदिर प्रशासनाने आता भक्तांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. रामजन्मभूमी मंदिर न्यासाने ही नियमावली लागू केली आहे.

का तयार करण्यात आली नियमावली?

राम मंदिराला रोज १ ते दीड लाख लोक भेट देत आहेत त्या अनुषंगाने ही नियमावली तयार करण्यात आली आहे असं राम जन्मभूमी न्यासातर्फे सांगण्यात आलं आहे.

हे वाचले का?  त्र्यंबकेश्वरसाठी महाशिवरात्रीनिमित्त आजपासून जादा बससेवा

राम भक्तांसाठी काय आहे नवी नियमावली?

सकाळी ६.३० ते रात्री ९.३० या कालावधीत मंदिर भक्तांसाठी खुलं राहणार आहे.

राम मंदिरात प्रवेश केल्यापासून दर्शन करुन बाहेर पडेपर्यंतची प्रक्रिया अत्यंत सहज सोपी आहे. ती पूर्ण केल्यानंतर भक्तांना ६० ते ७५ मिनिटांत प्रभू रामाचं दर्शन घेता येईल.

भक्तांनी दर्शन घेण्याआधी त्यांचेकडे असलेले मोबाईल फोन, पर्सेस इतर महत्त्वाच्या वस्तू या मंदिराबाहेरच्या परिसरात ठेवाव्यात. जेणेकरुन त्यांचं दर्शन सुलभपणे होईल

मंदिरात कुठल्या प्रकारची फुलं, हार, प्रसाद घेऊन येऊ नये.

पहाटे चार वाजता रामलल्लाची मंगल आरती असेल, सकाळी सहा वाजता श्रीनगर आरती आणि रात्री १० वाजता शेजारती होईल. या तिन्ही आरत्यांना उपस्थित राहायचं असेल तर पास घेणं आवश्यक. इतर आरत्यांना पास अनिवार्य नाही.

हे वाचले का?  Gaganyaan Mission : राकेश शर्मानंतर कोणते भारतीय अंतराळवीर अवकाशात जाणार ? पंतप्रधान मोदींनी जाहिर केली चार नावे….

जो पास दिला जाईल त्यावर भक्ताचं पूर्ण नाव, वय, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि शहराचं नाव या गोष्टी असणं अनिवार्य

या पाससाठी कुठलंही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसंच हा पास रामजन्मभूमी न्यासाच्या वेबसाईटवरही उपलब्ध असणार आहे. त्यामध्ये उपरोक्त सगळ्या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे.

मंदिरातल्या रामलल्लाच्या दर्शनासाठी कुठलाही विशेष पास नसणार, तसंच कुठलंही पेड दर्शन किंवा तत्सम पास मिळणार नाही. राम भक्तांनी अशा प्रकारे कुठल्याही फसवणुकीला बळी पडू नये. अशा प्रकारची कुठल्याही फसवणूक झाल्यास मंदिर प्रशासन जबाबदार असणार नाही.

मंदिरात येणाऱ्या वृद्ध आणि दिव्यांग भक्तांसाठी व्हिलचेअर म्हणजेच चाकाच्या खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही खुर्ची फक्त राम मंदिर परिसरातच वापरता येणार आहे. इतर कुठल्याही मंदिरात किंवा अयोध्येत फिरण्यासाठी सदर खुर्ची वापरता येणार नाही. या खुर्चीसाठी कुठलंही शुल्क आकारण्यात येणार नाही.