राम मंदिरामुळे उत्तर प्रदेश होणार धनवान, एसबीआय रिसर्चचा अहवाल; राज्याला चार लाख कोटींचे उत्पन्न मिळणार

अयोध्येतील राम मंदिरामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे. अयोध्येत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अयोध्येतील राम मंदिरामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे. अयोध्येत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. राम मंदिर आणि त्याच्याशी निगडित पर्यटनामुळे उत्तर प्रदेश चालू वर्षात ४ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत होईल, असा अंदाज एसबीआय रिसर्चने वर्तविला आहे.

राम मंदिरामुळे अयोध्येत देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. आगामी काळात त्यात आणखी वाढ होणार आहे. यामुळे राज्यातील राम मंदिर आणि इतर निगडित पर्यटनाला गती मिळणार आहे. त्यातून चालू वर्षात उत्तर प्रदेशला ४ लाख कोटी रुपये मिळतील. पुढील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये उत्तर प्रदेशच्या कर संकलनात ५ हजार कोटी रुपयांनी वाढ होण्याचा अंदाज आहे, असे एसबीआय रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे.

हे वाचले का?  विश्लेषण : भारतीय नौदलाकडेही आता ब्राम्होस क्षेपणास्त्र… मारक क्षमतेत कसा फरक पडणार?

परदेशी भांडवली बाजार संशोधक संस्था जेफरीजने व्हॅटिकन सिटी आणि मक्का यांना भेट देणाऱ्या भाविकांपेक्षा अयोध्येला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असेल, असा अंदाज वर्तविला आहे. अयोध्येत दरवर्षी सुमारे ५ कोटी भाविक भेट देतील. केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर देशभरात ते मोठे पर्यटन केंद्र बनेल, असेही जेफरीजने म्हटले आहे.

अयोध्येचा वार्षिक महसूलही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजीला दरवर्षी अडीच कोटी भाविक भेट देतात. त्यातून दरवर्षी १ हजार २०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. वैष्णोदेवीला दरवर्षी ८० लाख भाविक भेट देतात आणि त्यातून ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. आग्य्रातील ताजमहालला दरवर्षी ७० लाख जण भेट देतात आणि त्यातून १०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. आग्य्रातील किल्ल्याला दरवर्षी ३० लाख जण भेट देतात आणि त्यातून २७.५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.

हे वाचले का?  तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान ; दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, अमित शहा यांचे भवितव्य ठरणार१२ राज्यांमध्ये ९३ जागा

इतर धार्मिक पर्यटनस्थळांनाही उभारी

अयोध्येला जाणारे भाविक हे केवळ तेवढ्या एकाच ठिकाणी जाणार नाहीत तर ते आजूबाजूच्या धार्मिक पर्यटनस्थळांना भेट देतील. त्यात वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर आणि मथुरेतील बांके बिहारी मंदिर यांचा समावेश आहे. त्यातून वाराणसी आणि मथुरा येथील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. अयोध्येमुळे पुढील काळात उत्तर प्रदेशच्या उत्पन्नात दरवर्षी १ लाख कोटी रुपयांची भर पडेल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.