रेल्वेत हजारो लोको पायलट्सची भरती; जाहिरात शेअर करत राज ठाकरे म्हणाले, “मराठी तरुण-तरुणींना…”

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयात सहाय्यक लोको पायलटपदी नोकर भरतीची जाहिरात निघाली आहे. ही जाहिरात येताच राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सतर्क केलं असून गरजू तरुणांना मदत करण्याचंही आवाहन केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने मराठी अस्मिता आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर चर्चा करतात. तसंच, सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा, असा त्यांचा आग्रह असतो. याकरता त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनाही सहाय्य करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, आता भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयात सहाय्यक लोको पायलटपदी नोकर भरतीची जाहिरात निघाली आहे. ही जाहिरात येताच राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सतर्क केलं असून गरजू तरुणांना मदत करण्याचंही आवाहन केलं आहे.

राज ठाकरे यांनी भरतीची जाहिरात शेअर करत एक्सवर पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणाले, भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे. अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा “रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग ह्यासाठी तत्पर आहेच.

हे वाचले का?  शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिककरांची कोंडी; वन जमिनींच्या प्रश्नावर मंगळवारी मुंबईत बैठक

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर ह्याचा रितसर तपशील लावावा. ह्याविषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे.

हे वाचले का?  नाशिक : राष्ट्रीय लोक न्यायालयात ११ हजारहून अधिक प्रकरणे निकाली, ७९ कोटींचे तडजोड शुल्क वसूल

देशाच्या पंतप्रधानांना आपल्या भाषेचा अभिमान असेल तर…

दरम्यान, काल २८ जानेवारी रोजी नवी मुंबईत दुसरे विश्व मराठी संमेलन पार पडले. या संमेलनात त्यांनी मराठी भाषा आणि शाळांचा मुद्दा उचलून धरला. ते म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांना आपल्या भाषेचा व आपल्या राज्याचा अभिमान असेल तर आम्ही मराठीचा अभिमान का बाळगू नये. महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात राहणाऱ्या मराठी माणसाने मराठी भाषेचा व महाराष्ट्राचा अभिमान बाळगला पाहिजे.

“मी अत्यंत कडवट मराठी माणूस आहे. माझ्यावर तसे संस्कार माझे आजोबा, वडील व बाळासाहेब यांच्याकडून झालेत. महाराष्ट्र राज्य सरकारने मराठीसाठी जे करायचे ते करावे. पण सर्व भाषांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करा, असे आवाहन राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना केले”, असे राज ठाकरे यांनी सांगितले.