रोहित पवारांच्या कंपनीशी संबंधित ५० कोटींच्या मालमत्तांवर टाच, राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ची कारवाई

कन्नड सहकारी साखर कारखानाही (एसएसके) रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीने ५० कोटी रुपयांना खरेदी केला. ‘बारामती अॅग्रो’ने कन्नड एसएसके खरेदी करण्यासाठी लागलेला पैसा कोठून आणला, याचाही ईडी तपास करत आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा’चे गटाचे आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो’ कंपनीशी संबंधित ५० कोटी २० लाख रुपयांच्या मालमत्तेवर शुक्रवारी टाच आणली.

ईडीने टाच आणलेल्या मालमत्तांमध्ये बारामती अॅग्रोशी संबंधित कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील १६१.३० एकर जमीन, प्लाण्ट, यंत्रसामग्री, साखर युनिटची इमारत यांचा समावेश असल्याची माहिती ‘ईडी’ने दिली.

रोहित पवार यांच्या बारमती अॅग्रो आणि अन्य कंपन्यांनी संगनमताने संशयास्पद व्यवहार करून तोट्यात गेलेले साखर कारखाने लिलावाद्वारे खरेदी केल्याचा आरोप आहे. कन्नड सहकारी साखर कारखानाही (एसएसके) रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने ५० कोटी रुपयांना खरेदी केला. ‘बारामती अॅग्रो’ने कन्नड एसएसके खरेदी करण्यासाठी लागलेला पैसा कोठून आणला, याचाही ईडी तपास करत आहे.

हे वाचले का?  जुन्या निवृत्तीवेतनाचा लाभ केवळ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाच, वित्त विभागाची हायकोर्टात माहिती…

ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, बारामती अॅग्रोने ‘कन्नड एसएसके’साठी बोली लावण्यासाठी हायटेक इंजिनियरिंग कॉर्पोरेशन या कंपनीशी संगनमत केले आणि चुकीच्या पद्धतीने बोली जिंकण्यासाठी लिलाव प्रक्रियेत फेरफार केल्याचा संशय आहे. बारामती अॅग्रोने बोली प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आणि बारामती अॅग्रोपेक्षा कमी रकमेची बोली लावण्यासाठी ‘हायटेक इंजिनियरिंग कॉर्पोरेशन’ला काही रक्कम दिल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, २२ ऑगस्ट, २०१९ रोजी १२० (ब), ४२०, ४६७, ४६८, ४७१ भादंवि सह भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या कलम १३(१) (ब) व १३ (१) (क) नुसार एमएससीबी बँकप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने ईडीने २६ ऑगस्ट, २०१९ रोजी ‘पीएमएलएल’ कायद्यानुसार तपासाला सुरूवात केली होती. ईडीने गेल्यावर्षी रोहित पवार यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर, हे प्रकरण थंडावले होते. ईडीने या कंपनीसह अन्य पाच कंपन्या, संबंधित व्यक्ती यांच्या मुंबई, पुणे, बारामती येथील सहा ठिकाणी ५ जानेवारी रोजी छापे टाकले होते. त्यानंतर २४ जानेवारी रोजी रोहित पवार यांना ईडीने चौकशीला बोलावले होते. त्यावेळी त्यांची सुमारे १२ तास चौकशी करण्यात आली होती.

हे वाचले का?  चौथ्या टप्प्यात मत टप्पा वाढविण्याचे आव्हान

यापूर्वी एमएससीबी बँकेतीतल कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडीने १२१ कोटी ४७ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. तसेच या प्रकरणात एक आरोपपत्र आणि दोन पुरवणी आरोपत्रेही दाखल करण्यात आली आहेत.

साखर कारखान्यांवर कारवाई झाल्यावर भाजपमध्ये प्रवेश करायला हवा का, असा विचार मनात आला. पण मी रडणारा आणि झुकणारा नेता नाही हे भाजपने लक्षात ठेवावे. माझ्या विरोधात लागोपाठ दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली. केवळ माझ्याच विरोधातच कारवाई का केली जाते, असा सवाल राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

हे वाचले का?  उद्धव ठाकरेंबरोबर वादाची ठिणगी का पडली? एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘वर्षा’वरील तो प्रसंग; म्हणाले, “मला दोन तास…”

झुकणारे आणि रडणारे नेते गेले आहेत. आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू. माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्ने बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नेच बघावीत. ही कारवाई पूर्णत: बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काळजी करू नये. वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका यंत्रणेने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई झाली, असे पवार म्हणाले.