विश्लेषण: ‘गो फर्स्ट’च्या दिवाळखोरीचा हवाई क्षेत्रावर परिणाम काय?

‘गो फर्स्ट’ आधी ‘गो एअर’ नावाने ओळखली जात होती. कंपनीने महत्त्वाकांक्षेने विमानसंख्या वाढवण्याबरोबरच आक्रमकपणे विस्तार केला होता.

‘गो फर्स्ट एअरलाइन्स’ने दिवाळखोरीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे अर्ज केला आहे. ‘गो फर्स्ट’च्या दिवाळखोरीचा फायदा तूर्त प्रतिस्पर्धी कंपन्यांना होईल, असे दिसत असले तरी हवाई क्षेत्रावरील संकट पुन्हा समोर आले आहे.

हवाई वाहतूक क्षेत्रात ‘गो फर्स्ट’चे स्थान काय?

‘गो फर्स्ट’ आधी ‘गो एअर’ नावाने ओळखली जात होती. कंपनीने महत्त्वाकांक्षेने विमानसंख्या वाढवण्याबरोबरच आक्रमकपणे विस्तार केला होता. तिकिटांचे दर प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा कमी ठेवून ‘गो फर्स्ट’ स्पर्धेत उतरली. गेल्या वर्षी या कंपनीचा हवाई वाहतूक क्षेत्रातील हिस्सा सुमारे ८.८ टक्के होता. कंपनीने गेल्या वर्षी १ कोटी ९ लाख प्रवाशांची वाहतूक केली. कंपनीच्या दररोजच्या उड्डाणांची संख्या सुमारे २०० होती. कंपनीकडील गंगाजळी आटल्याने कामकाज बंद करण्याची अचानक घोषणा करण्यात आली. यासाठी कंपनीने ‘प्रॅट अँड व्हिटनी’ कंपनीला जबाबदार धरले. या कंपनीच्या विमान इंजिनात वारंवार समस्या निर्माण होत असल्याने ‘गो फर्स्ट’ला एअरबस ए३२० निओ ही २५ विमाने बंद ठेवावी लागली. याचाच सर्वाधिक फटका कंपनीला बसला. ‘प्रॅट अँड व्हिटनी’ कंपनीने करारातील अटी पाळल्या नाहीत, असा कंपनीचा दावा होता.

हे वाचले का?  Jharkhand : झारखंडमध्ये आजी-माजी मुख्यमंत्री आघाडीवर, JMM आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत!

इंजिनची समस्या नेमकी काय?

‘प्रॅट अँड व्हिटनी’ कंपनीच्या इंजिनची समस्या २०१६ पासून सुरू झाली. सुरुवातीपासूनच त्यात तांत्रिक समस्या येत होत्या. त्यामुळे २०१९ मध्ये भारतीय हवाई वाहतूक नियामकांनी ही सदोष इंजिन्स बदलण्याचे निर्देश सर्व कंपन्यांना दिले होते. इंडिगोसमोरही हीच समस्या होती. परंतु, कंपनीकडे विमानांची संख्या जास्त असल्याने त्यातून तिला मार्ग काढता आला. ‘गो फर्स्ट’ला ‘प्रॅट अँड व्हिटनी’कडून बदली इंजिनचा वेळेत पुरवठा झाला असता, तर ही समस्या निर्माण झाली नसती, असा कंपनीचा दावा आहे. किमान दहा इंजिनचा पुरवठा या वर्षात होणे अपेक्षित होते. ‘प्रॅट अँड व्हिटनी’ने कराराचे पालन केले असते, तर कंपनी फायद्यात राहिली असती, असा ‘गो फर्स्ट’चा दावा आहे. याउलट ‘गो फर्स्ट’ने आर्थिक दायित्व सांभाळले नसल्याचा आरोप ‘प्रॅट अँड व्हिटनी’ने केला आहे.

ऐन मोसमात प्रवासी वाऱ्यावर?

जेट एअरवेज २०१९ मध्ये बंद पडल्यानंतर दिवाळखोरीत जाणारी ‘गो फर्स्ट’ ही दुसरी मोठी कंपनी ठरली आहे. कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज केल्याने ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रशासक काम पाहतील. या सर्व कायदेशीर प्रक्रियेच्या बाबी सोडून दिल्यास ‘गो फर्स्ट’ बंद झाल्याचा प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. प्रवाशांना तिकीट परतावा देण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. परंतु, आधीपासून तिकीट नोंदणी केलेल्या प्रवाशांची यामुळे गैरसोय होणार आहे. ऐनवेळी त्यांना जास्त किमतीचे दुसऱ्या कंपनीचे तिकीट खरेदी करावे लागेल. उन्हाळ्यात सुट्यांमुळे प्रवाशांची संख्या जास्त असते. याच वेळी ‘गो फर्स्ट’ बंद झाल्याने इतर कंपन्यांची तिकिटे आपोआप महागली. तिकिटाचे दर सरासरी दुप्पट अथवा तिप्पट झाल्याने प्रवाशांना भुर्दंड बसला.

हे वाचले का?  Lal Krishna Advani : लालकृष्ण आडवाणी, टेनिसची मॅच आणि संघाचं सदस्यत्व! काय आहे ‘तो’ रंजक किस्सा?

हवाई वाहतूक क्षेत्रावर नेमका परिणाम काय?

‘गो फर्स्ट’ कंपनीवर बँकांचे ६ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. याच वेळी कंपनीवरील एकूण दायित्व ११ हजार ४०० कोटी रुपयांचे आहे. बँकांचे २५ ते ३० टक्क्यांहून अधिक कर्ज वसूल होऊ शकणार नाही, असा अंदाज आहे. याचा फटका पर्यायाने कर्जदार बँकांना बसणार आहे. याच वेळी ‘गो फर्स्ट’च्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना फायदा झाला आहे. या विमान कंपन्या तिकिटांचे दर वाढवून फायदा करून घेत आहेत. खासगी विमान कंपन्यांना देशांतर्गत उड्डाणाला १९९४ मध्ये परवानगी देण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत किमान २७ विमान कंपन्या व्यवसायातून बाहेर पडल्या आहेत. त्या एकतर बंद करण्यात आल्या किंवा त्यांचे अधिग्रहण किंवा अन्य कंपन्यांमध्ये विलिनीकरण झाले. त्यामुळे ‘गो फर्स्ट’च्या बंद होण्याचा फायदा सध्या इतर कंपन्यांना होत असला, तरी हवाई वाहतूक क्षेत्रावरील संकट पुन्हा समोर आले आहे.

हे वाचले का?  महामतदान २० नोव्हेंबरला! राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २३ नोव्हेंबर रोजी निकाल

संजय जाधव