विश्लेषण: मधमाश्या मानवजातीसाठी का महत्त्वाच्या?

मधमाश्या नेमके काय काम करतात? अलिकडेच साजऱ्या झालेल्या जागतिक मधमाशी दिनानिमित्त घेतलेला हा आढावा…

दत्ता जाधव

मधमाश्या पृथ्वीवरून नष्ट झाल्या तर मानव फक्त चारच वर्षे जगू शकेल, असे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाईनने म्हटले होते. मानवजातीसाठी, पर्यावरणासाठी खरेच मधमाश्या इतक्या महत्त्वाच्या आहेत का? या मधमाश्या नेमके काय काम करतात? अलिकडेच साजऱ्या झालेल्या जागतिक मधमाशी दिनानिमित्त घेतलेला हा आढावा.

जागतिक मधमाशी दिन का साजरा केला जातो?

मधमाश्या, पक्षी आणि वटवाघूळ जगातील ३५ टक्के शेतीपिकांचे परागीकरण करतात. जगातील प्रमुख ८७ पिकांचे परागीकरण मधमाश्यांमुळे होते, ज्यामुळे मानवाला अन्नधान्य उत्पादन मिळते. एवढेच नाही, तर दैनंदिन आहारात वापरल्या जाणाऱ्या दर चार पिकांपैकी तीन पिकांना परागकणांची गरज असते. त्यामुळे मानवासाठी परागीभवन करणाऱ्या मधमाश्याश्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मधमाश्यांशिवाय मानवाच्या अस्तित्वाची कल्पनाच करता येणार नाही. २० मे २०१८पासून जागतिक मधमाशी दिन साजरा होऊ लागला. मधमाश्यांचे महत्त्व ओळखून स्लोव्हेनियन सरकारने २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्रासमोर २० मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून जाहीर करण्याची मागणी केली होती. या शिवाय आधुनिक मधमाशी पालनाचे जनक अँटोन जना यांचा जन्म २० मे १७३४ रोजी झाला होता. त्यांचे स्मरण म्हणूनही २०१८पासून जागतिक मधमाशी दिन साजरा केला जातो.

मधमाश्या नेमके काय काम करतात ?

केवळ मानवच नव्हे तर वन्यप्राणी, पाळीव प्राणी, पशू-पक्ष्यांसाठी मधमाश्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. निसर्ग साखळी आणि अन्न साखळीतही मधमाश्या आपले महत्त्वपूर्ण योगदान देतात. मधमाश्या मध गोळा करताना परागीभवन करतात. पाय आणि पंखांना चिकटलेले परागकण दुसऱ्या फुलांमध्ये टाकतात. त्यामुळे मानवजातीला, पशू-पक्षी आणि प्राण्यांना लागणाऱ्या फळा-फुलांची निर्मिती होते. मधमाश्यांमुळेच मानवाला चांगली फळे, बिया आणि पिकांचे उत्पादन घेता येते. आता अनेक शेतकरी व्यवसाय म्हणून मधमाशी पालन करीत आहेत. मधमाश्यांपासून मध मिळतोच, शिवाय परागीभवन चांगल्या प्रकारे झाल्यामुळे विविध पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा उत्पादन घेण्यासाठी मधमाश्यांची मदत होते.

हे वाचले का?  अनुसूचित जमातींमधून आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदोलन

मधमाश्या खरोखरच धोक्यात आहेत ?

जगातील वाढत्या लोकसंख्येचे पोट भरण्यासाठी पीक पद्धतीत मोठे बदल झाले आहेत. हवामान बदलांमुळे जगभरातील शेतीत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रोगांचा, बुरशींचा आणि कीडनाशकांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यासाठी पिकांवर कीडनाशकांच्या, बुरशीनाशकांच्या फवारण्या वाढत आहेत. ड्रोन सारख्या तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोठ्या क्षेत्रावर कीडनाशकांची फवारणी केली जात आहे. त्याचा परिणाम म्हणून मधमाश्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. कीडनाशकांच्या फवारणीमुळे मधमाश्या नष्ट होत आहेत. किंवा फवारणी केलेल्या फळे, फुलांमधून मध गोळा करीत नाहीत, मध मिळत नसल्यामुळे त्या स्थलांतर करतानाही दिसून आल्या आहेत. त्याचा परिणाम शेती उत्पादनांवर होताना दिसत आहे. अमेरिकेत एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या काळामध्ये मधमाशी पालकांच्या सुमारे ४०.७ टक्के मधमाशी वसाहती नष्ट झाल्याचा दावा मेरीलँड विद्यापीठातील संशोधकांनी केला होता. केवळ अमेरिकेचा विचार करता मधमाश्या कृषी उत्पादनासाठी महत्त्वाच्या आहेत, परागीकरणामुळे निर्माण होणाऱ्या कृषी उत्पादनाचे मूल्य प्रतिवर्ष १५ अब्ज डॉलर इतके आहे. भारतात मधमाश्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. वाढते शहरीकरण, कीडनाशकांचा वापर, बदलेल्या पीक पद्धतीचा परिणाम म्हणून मधमाश्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. पण, त्याबाबत देश पातळीवर ठोस अभ्यास झालेला दिसत नाही.

हे वाचले का?  Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम

मधमाश्यांच्या जाती किती आणि कोणत्या ?

मधमाश्यांपासून मिळणारा मध हेच प्रमुख उत्पादन आहे. मध अत्यंत पौष्टिक अन्न आणि औषध आहेच. त्याशिवाय मधमाश्या मेण देतात, जे सौंदर्य प्रसाधने, औद्योगिक उत्पादनात वापरले जाते. मधमाश्यांपासून मिळणारे राजान्न (रॉयल जेली), दंश विष आदींना उच्च प्रतीचे औषधी मूल्य आहे. देशात मधमाशीच्या ॲपीस सेरेना इंडिका (भारतीय सातेरी मधमाशी), ॲपीस डोरसेटा (आग्या माशी), ॲपीस फ्लोरीया (लहान मधमाश्या), ॲपीस अन्द्रेनिफार्मिस (हिमालयातील मधमाशी), ॲपीस लेबोरीओसा आणि ॲपीस केचेवानिकोवी या प्रजाती आहेत. न चावणारी ॲपीस मेलीफेरा ही प्रजाती युरोपातून आयात केलेली आहे. म्हणून तिला युरोपियन मधमाशी म्हणतात. सर्व प्रजाती शत्रूपासून संरक्षणासाठी दंश काट्याचा उपयोग करतात. तर मेलीपोनी कुटुंबातील डॅमर बी दंश करताना काटा मारत नाही. ती दंशहीन आहे. भारतीय सातेरी मधमाश्यांपासून एका वर्षात २ ते ५ किलो मध प्रति वसाहतीमागे मिळतो, तर युरोपीय मधमाश्यांपासून ४५ ते १५० किलो मध मिळू शकतो.

देशाची मध उत्पादनाची स्थिती काय ?

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील मध उत्पादन २०२०-२१ मध्ये १ लाख २५ हजार टन होते. ते २०२१-२२ पर्यंत १ लाख ३३ हजार २०० टनांवर पोचले आहे. या काळात देशातील मध उत्पादनात जवळपास ७ टक्क्यांची वाढ झाली. देशातून मध निर्यात २०२०-२१ यावर्षात ६० हजार टन झाली होती. तर २०२१-२२ मध्ये मधाची निर्यात जवळपास ७५ हजार टनांवर पोचली. म्हणजेच मध निर्यात २४ टक्क्यांनी वाढली आहे. सरकारने देशातील मध उत्पादन १ लाख ६० हजार टनांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. देशभरात मधमाशीपालनासाठी ८० शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ ) स्थापन झाल्या आहेत. केंद्र सरकारने देशात १० हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी १०० शेतकरी उत्पादक कंपन्या मधमाशी पालनाशी संबंधित असाव्यात असाही सरकारचा प्रयत्न आहे.

हे वाचले का?  पूर्व लडाखमध्ये सैन्यमाघारी पूर्ण, भारत-चीन सैनिकांमध्ये आज दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण

जागतिक मध बाजारात भारत कुठे?

भारताने २०२०-२१ या वर्षात ७१६ कोटी रुपये किंमतीच्या ६० हजार टन नैसर्गिक मधाची निर्यात केली आहे. जागतिक मधाच्या बाजारात एकट्या अमेरिकेचा वाटा ४४ हजार ८८१ टन म्हणजेच जवळपास ७५ टक्के इतका आहे. युरोप आणि इतर देशांमध्ये मधाच्या निर्यातीसाठी विश्वासार्ह पुरवठा साखळी सुनिश्चित करण्यासाठी अपेडा ही संस्था कार्यरत आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बांगलादेश आणि कॅनडा या प्रमुख देशांना भारतातून मध निर्यात होतो. देशातून मधाची निर्यात १९९६-९७ मध्ये सुरू झाली. २०२० पर्यंत ७ लाख ३६ लाख टन निर्यातीसह जागतिक व्यापारात भारत नवव्या स्थानावर होता. या शिवाय जागतिक मध उत्पादनामध्ये भारत आठव्या क्रमांकावर आहे. चीन, तुर्कस्तान, कॅनडा, अर्जेंटिना, इराण आणि अमेरिका हे प्रमुख मध उत्पादक देश आहेत.