महाराष्ट्रातून पाच लाख ३५ हजार ३४३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व शिक्षणक्रमाच्या सत्र, वार्षिक लेखी परीक्षा महाराष्ट्रातील विविध ६४३ केंद्रावर सुरळीत सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रातून पाच लाख ३५ हजार ३४३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. १०९ शिक्षणक्रमांच्या परीक्षेत तब्बल ३१ लाखहून अधिक उत्तरपत्रिका लिहिल्या जाणार आहेत.
कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार विद्यापीठाच्या परीक्षा सुरु झाल्या असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक तथा प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनी दिली. या परीक्षा ऑफलाईन असून पूर्वीप्रमाणेच विवरणात्मक पद्धतीने होत आहेत. परीक्षा आयोजनाच्या सर्व मार्गदर्शन सूचना विभागीय केंद्रांमार्फत अभ्यासकेंद्रांना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांसाठी मदत यंत्रणाही कार्यरत करण्यात आली आहे.
आठ मेपासून सुरु असलेल्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीत पार पडल्या. अंतर्गत गुण अभ्यासकेंद्रांना ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी नऊ जूनपर्यंत मुदत दिलेली आहे. या विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरी, व्यवसाय, पोलीस, सैनिक, गृहिणी, शिक्षक आदी विविध घटकातील आहेत. १०९ शिक्षणक्रमांचे विविध विषय मिळून तब्बल ३१ लाखाहून अधिक उत्तरपत्रिका लिहिल्या जाणार आहेत. या लेखी परीक्षा १६ जूनपर्यंत सुरु राहतील.