IPL Auction 2024: ट्वेन्टी२० यशासाठी वनडेचा उतारा; कमिन्स-स्टार्क मिचेल- रवींद्र-गेराल्ड यांना संघांचं प्राधान्य

IPL 2024 Auction: नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयपीएलमधील संघांनी ताफ्यात समाविष्ट केलं आहे.

आयपीएल लिलाव दुबईत होत आहे. काही दिवसांपूर्वीच आटोपलेल्या वनडे वर्ल्डकपचे प्रतिसाद लिलावात पाहायला मिळत आहेत. आयपीएल या ट्वेन्टी२० स्पर्धेसाठी संघांनी वनडे वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना ताफ्यात दाखल केलं आहे. ट्वेन्टी२० प्रकारात गोलंदाजांना चारच ओव्हर्स मिळतात. सगळ्या फलंदाजांना मिळून वीसच ओव्हर्स असतात. त्यामुळे कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांना प्राधान्य मिळतं. गोलंदाजांना अनेकदा फलंदाजांचा तडाखा सहन करावा लागतो. यॉर्कर, स्लोअरवन, कटर, बॅक ऑफ द हँड चेंडू टाकत धावा रोखणे आणि विकेट्स पटकावणे अशी गोलंदाजांवर दुहेरी जबाबदारी असते. वनडेत फलंदाजांना मोठी खेळी करण्यासाठी वेळ मिळतो. गोलंदाजांना १० ओव्हर्स मिळतात. त्यामुळे ट्वेन्टी२० आणि वनडे जरी पांढऱ्या चेंडूनिशी खेळले जात असले तरी खेळाडू बदलतात. ट्वेन्टी२० खेळाडूंची फौज तयार होते आहे. आयपीएलच्या धर्तीवर जगभरात लीग होत आहेत. त्यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा प्राधान्याने विचार होतो.

ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकपविजेता कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबाद संघाने तब्बल २०.५ कोटी रुपयांची बोली लावून ताफ्यात समाविष्ट केलं. कमिन्स याआधी दिल्ली आणि कोलकाता संघांसाठी खेळला आहे. पण आता तो हैदराबादकडून खेळताना दिसेल. लिलावात हैदराबादचा संघ ज्या तीव्रतेने कमिन्सला संघात घेण्यासाठी आतूर होता ते बघता कमिन्स हैदराबादचा कर्णधार असू शकतो. कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या संघाला अॅशेस मालिका, वनडे वर्ल्डकप, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे. कमिन्स टेस्ट आणि वनडे प्रकारात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे तसंच प्रमुख गोलंदाजही आहे. ऑस्ट्रेलियाचं व्यग्र कॅलेंडर आणि वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करता कमिन्स आयपीएल स्पर्धेत दोन महिने सगळे सामने खेळणार का? हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे. कमिन्स आयपीएल स्पर्धेत ४२ सामने खेळला असून त्याच्या नावावर ४५ विकेट्स आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत कमिन्सने ११ सामन्यात १५ विकेट्स घेतल्या होत्या. विकेट्सपेक्षाही कमिन्सचं नेतृत्व ऑस्ट्रेलियासाठी निर्णायक ठरलं होतं.

हे वाचले का?  कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका, भारताच्या परराष्ट्र नीतीचं मोठं यश

वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं हुकूमी एक्का मिचेल स्टार्कने १० सामन्यात १६ विकेट्स घेतल्या होत्या. स्टार्कसाठी लिलावात कोलकाता आणि गुजरात यांच्यात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. स्टार्कसाठी आयपीएल इतिहासातली सर्वोच्च बोली लागली. कोलकाताने तब्बल २४.७५ कोटी रुपये खर्चून त्याला ताफ्यात घेतलं. वर्ल्डकप स्पर्धेचं गारुड स्टार्कच्या बाबतीतही पाहायला मिळालं. स्टार्क याआधी बंगळरू संघाकडून खेळला आहे. दुखापती आणि व्यग्र कॅलेंडर यामुळे स्टार्क प्रदीर्घ काळ आयपीएल स्पर्धेपासून दूर राहिला आहे. विशेष म्हणजे स्टार्क ट्वेन्टी२० प्रकारात ऑस्ट्रेलियासाठी फारसा खेळत नाही. स्टार्क ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज आहे. यंदा ट्वेन्टी२० वर्ल्डकप आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सतत खेळतो आहे. हे सगळं आणि दुखापतींची शक्यता पाहता स्टार्क कोलकातासाठी किती खेळतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हे वाचले का?  तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान ; दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, अमित शहा यांचे भवितव्य ठरणार१२ राज्यांमध्ये ९३ जागा

वर्ल्डकप स्पर्धेत फायनल आणि सेमीफायनल लढतीत सामनावीर ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडला सनरायझर्स हैदराबादने त्वरित ताफ्यात समाविष्ट केलं. हेड यापूर्वी दिल्ली आणि बंगळुरू संघांसाठी खेळला आहे. पण त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. ऑस्ट्रेलियासाठी तीन वर्षांनी पुनरागमन केल्यानंतर हेड झंझावाती फॉर्ममध्ये आहे. तडाखेबंद फटकेबाजी, उपयुक्त फिरकी आणि अफलातून क्षेत्ररक्षण यामुळे हेड कुठल्याही संघाचा अविभाज्य घटक असू शकतो. हेडने नुकत्याच झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत ६ सामन्यात ३२९ धावा केल्या होत्या.

वर्ल्डकप स्पर्धेत सेमी फायनलच्या लढतीत भारताविरुद्ध न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेलने दिमाखदार शतकी खेळी साकारली होती. भारताने या लढतीत विजय मिळवला पण डोंगराएवढं लक्ष्य असतानाही मिचेलने केलेल्या जिगरबाज खेळीचं कौतुक झालं होतं. उत्तम तंत्रानिशी खेळणारा मिचेल उपयुक्त गोलंदाजीही करतो. फिरकीपटूंचा चांगल्या पद्धतीने सामना करतो. अतिशय चपळ क्षेत्ररक्षक आहे. त्यामुळे मिचेलला संघात घेण्यासाठी अनेक संघ उत्सुक होते. चेन्नई सुपर किंग्सने अगदी शेवटी मुसंडी मारत मिचेलला आपल्याकडे वळवलं. मिचेल याआधी राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. मिचेलने वर्ल्डकप स्पर्धेत १० सामन्यात ६९च्या सरासरीने ५५२ धावा केल्या होत्या. यामध्ये २ शतकं आणि २ अर्धशतकांचा समावेश होता.

मिचेलप्रमाणेच न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू खेळाडू रचीन रवींद्रने वर्ल्डकप स्पर्धेत दणका उडवून दिला होता. मायकेल ब्रेसवेलला झालेल्या दुखापतीमुळे रवींद्रला संधी मिळाली. केन विल्यमसन दुखातीतून न सावरल्याने रवींद्रला अंतिम अकरात संधी देण्यात आली. रवींद्रने या संधीचा पुरेपूर फायदा उठवत १० सामन्यात ६४.२२च्या सरासरीने ५७८ धावा केल्या. यामध्ये ३ शतकं आणि २ अर्धशतकांचा समावेश होता.

हे वाचले का?  विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

अफगाणिस्तानचा अष्टपैलू ओमरझाईने वर्ल्डकप स्पर्धेत सगळ्यांना प्रभावित केलं होतं. गुजरात टायटन्सने लिलावात ओमरझाईचं नाव येताच त्वरित त्याला संघात समाविष्ट केलं. त्याने ९ सामन्यात ३५३ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कुत्सियाने आपल्या वेगाने वर्ल्डकप काळात सगळ्यांना दखल घ्यायला भाग पाडलं होतं. गेराल्डने ८ सामन्यात २० विकेट्स घेतल्या होत्या. अनेकांना त्याला पाहून डेल स्टेनची आठवणही आली. रवीचंद्रन अश्विनने लिलावापूर्वी भाकीत करताना मुंबई इंडियन्स गेराल्डसाठी प्रयत्न करेल असं म्हटलं होतं. तसंच झालं आणि मुंबई इंडियन्सने त्याला त्वरेने संघात घेतलं.