नाशिक ग्रामीण पोलिसांना ४३ नवीन वाहने

नाशिक ग्रामीण पोलिसांना ४३ नवीन वाहने
( वाचण्यासाठी लागणारा वेळ अदमासे 3 मिनिट )

आगामी सिंहस्थ कुंभमेळा काळात देश-विदेशातुन मोठ्या प्रमाणावर भाविक तसेच पर्यटक नाशिकमध्ये येणार आहे. या काळात भाविकांची सुरक्षा लक्षात घेता व्यापक तयारी प्रगती पथावर आहे. या पार्श्वभूमीवर, नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलात ४३ नवीन वाहनांचा ताफा दाखल झाला आहे. नवीन वाहनांमुळे पोलीस यंत्रणा अधिक गतिमान होणार आहे.

नाशिक ग्रामीण परिसर भौगोलिकदृष्टया मोठा असुन जिल्ह्याला लागून गुजरातची सीमा आहे. जिल्ह्यात मालेगाव हा संवेदनशील भाग असल्याने पोलीस यंत्रणेला नेहमी सतर्क रहावे लागते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बंदोबस्त तैनात ठेवावा लागतो. आगामी काळात जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यावेळी कोट्यवधी भाविक, पर्यटक येणार आहेत. कायदा व सुव्यस्था, विशेष व अतिविशेष व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहन ताफ्यासाठी पोलिसांना वाहनांची गरज भासणार आहे.

जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी गड, मांगीतुंगी सारखी धार्मिक स्थळ आहेत. राज्यातून व परराज्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. कृषी उत्पन्न बाजार समित्या, पर्यटनस्थळे, विमानतळ या ठिकाणावर सुरक्षा बंदोबस्त, महत्वाच्या व्यक्तीच्या दौऱ्या वेळी वाहन ताफा पुरवणे आवश्यक असते. तसेच जिल्हातील नागरीकांच्या तक्रारीची शीघ्रतेने दखल घेण्यासाठी डायल ११२ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षास प्राप्त झालेल्या तक्रारीची माहिती तक्रारदाराच्या जवळ असलेल्या पोलीस वाहनास पुरविली जाते. नागरीकांच्या तक्रारींचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी वाहनांची गरज आहे. मात्र ग्रामीण पोलीस दलात अनेक वाहने नादुरूस्त आहेत.

See also  अभिनव भारत मंदिरासाठी सहा कोटींचा आराखडा

ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी वाहनांची मागणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समितीकडे नोंदवली होती. ग्रामीण पोलीस दलास वाहनांची असणारी निकड लक्षात घेऊन शासनाने त्यास प्राधान्याने मंजुरी देत ग्रामीण पोलीसांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून नवीन ४३ वाहने दिली. यामध्ये ३५ महिंद्रा बोलरो न्युओ, पाच महिंद्रा स्कोर्पिओ, दोन इनोव्हा, एक एक्सयुव्ही अशी ४३ वाहने प्राप्त झाली आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस दलास मंजुर असणाऱ्या ८३ वाहनांपैकी उर्वरीत ४० वाहने व आवश्यक वाहनांबाबत निधी मंजुर करून तातडीने वाहने पुरवण्यात येतील, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. पोलीस दलास आवश्यक ती साधनसामुग्री देण्यात तत्पर राहु असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या नव्या वाहनांच्या ताफ्याला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ताफ्यात समाविष्ट करण्यात आले. नव्या वाहनांमुळे ग्रामीण पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, रात्रगस्त, व्हीआयपी दौरे व पोलीस बंदोबस्त, नाकाबंदी आदी कामात मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.