नाशिक ठरतोय तरुण जिल्हा

नाशिक ठरतोय तरुण जिल्हा
( वाचण्यासाठी लागणारा वेळ अदमासे 2 मिनिट )

जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी २९ लाख ६ हजार ९०७ एवढी लोकसंख्या २४ वर्षे वयाच्या आतील आहे. हे प्रमाण लोकसंख्येच्या ३९ टक्के आहे. सर्वाधिक २५ लाख १२ हजार ८२० लोकसंख्या २५ ते ५४ वयोगटातील असून, एकेकाळी पेन्शनरांचे शहर अशी ओळख असलेले नाशिक आता तरुणांचा जिल्हा ठरू लागला आहे.

१८६९ मध्ये स्वतंत्र जिल्हा म्हणून नाशिकला ओळख मिळाली. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्याजवळ असणाऱ्या नाशिकला या दोन्ही महानगरांच्या बरोबरीने सुवर्णत्रिकोणात स्थान मिळाले. कृषीमालाचे भरघोस उत्पादन करून त्याची निर्यात करणारा हा जिल्हा उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र बनला आहे. साधारणत: १९७०- ८० च्या दशकानंतर नाशिकमध्ये औद्योगिक वसाहत विकसित होत गेली. मोठे कारखाने येऊ लागले. रोजगाराच्या निमित्ताने जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यांमधूनही लोक नाशिककडे धाव घेऊ लागले. याशिवाय शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थिसंख्याही वाढत गेली. रोजगार आणि शिक्षणाच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेल्या अनेकांनी येथेच स्थायिक होण्यास पसंती दिली. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ६१ लाख ९ हजार ५२ होती. गेल्या १५ वर्षांत ती ६६ लाखांच्या पुढे गेल्याचा अंदाज वर्तविला जातो.

See also  माजी आमदार भोसले, पांडे, वाघ, पाटील, खैरेंचा भाजपमध्ये प्रवेश

कृषीकडून कृषी पुरक तसेच औद्योगिक क्षेत्राकडे झेपावलेल्या नाशिकचा चेहरामोहरा लोकसंख्यादृष्टीनेही बदलला आहे. नाशिक जिल्ह्याची पहिली जनगणना ब्रिटिशकाळात १८८१ मध्ये झाली होती. त्यावेळी नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या ७ लाख ९० हजार २०७ इतर तर शहराची लोकसंख्या २४ हजार १०१ होती. गेल्या १४४ वर्षात जिल्ह्याची लोकसंख्या ८.४ पट तर शहराची लोकसंख्या १०० पटीने वाढली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या वाढीत नाशिकचा क्रमांक देशात ११ तर राज्यात तिसरा लागतो.