भाजपाचा सुरूवातीपासूनच अजेंडा समाजात वातावरण बिघडविण्याचा राहिला आहे, असा आरोप एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांची दयनीय अवस्था असूनही मुख्यमंत्री फक्त आश्वासनांची भाषा बोलत आहेत, कर्जमाफीची ठोस घोषणा केलेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर भागात खा. ओवेसी यांची सभा गुरूवारी सायंकाळी झाली. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ओवेसी म्हणाले, महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, शेतकरी हवालदिल झाला आहे. मुख्यमंत्री एकीकडे शेतकर्यांना भेटतात, पण दुसरीकडे फक्त आश्वासन देतात. त्यांना प्रत्यक्ष मदतीची गरज आहे, घोषणांची नव्हे. ओवेसी पुढे म्हणाले, ‘आय लव्ह मोहम्मद’ या वाक्यात कोणताही विवाद नाही. या देशातील 90 टक्के लोक धर्म, जाती, पंथ मानतात आणि आपल्या धर्मावर प्रेम करतात.
मग ‘लव्ह’ हा शब्द वापरल्याने काहींना त्रास का होतो? आमच्या धर्मात पैगंबर मोहम्मद यांच्यावर अपार प्रेम आहे. कायदा हातात घेणार्यांचा आम्ही विरोध करतो, पण इतरांच्या श्रध्दांवर गदा आणणे चुकीचे आहे. भाजपाने समजून घ्यावे की संविधानातील कलम 19 आणि 25 ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य यासाठी आहेत. मग कोणावर प्रेम करायचे हे सांगण्याचा अधिकार तुम्ही का घेताय ?
ओवेसी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याची घटना ही केवळ न्यायव्यवस्थेचा नव्हे तर दलित समाजाचाही अपमान आहे. अशा प्रकारच्या कृतींनी न्यायसंस्थेचा अपमान होतो, ज्याचा निषेध केला पाहिजे. लडाखमधील परिस्थितीवर बोलताना ओवेसी म्हणाले, लडाखमधील लोक आपली मागणी करत आहेत, ती सरकारने ऐकावी. राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना ओवेसी म्हणाले, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर अनेक घडामोडी घडल्या. राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जे पूर्वी शिव्या देत होते, त्यांनाच मंत्री करण्यात आले, ही दुर्दैवी बाब असल्याचे ते म्हणाले.


