पिंपरीत अजितदादा विरुद्ध चंद्रकांतदादा

पिंपरीत अजितदादा विरुद्ध चंद्रकांतदादा
( वाचण्यासाठी लागणारा वेळ अदमासे 4 मिनिट )

आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी राज्यातील सत्तेत सहभागी असलेला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात चुरस निर्माण झाली आहे.

महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपचे नेते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरातील राजकारणात लक्ष घातले आहे. भाजपचे शहरातील निर्णय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. एके काळचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही शहराकडे बारकाईने लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार यांचाच निर्णय अंतिम असतो. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत अजितदादा विरुद्ध भाजपचे चंद्रकांतदादा अशी लढाई होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणावर काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेसचे नेते दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शहराची सूत्रे आली. सलग १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता महापालिकेवर होती. अजित पवार यांच्या कलानेच शहरातील संपूर्ण निर्णय होत असे. २०१७ मध्ये भाजपने अजितदादांच्या गडाला सुरुंग लावला. महापालिकेतील सत्ता भाजपने खेचून घेतली. महापालिकेत सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवडला मंत्रिपद देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. परंतु, मंत्रिपद मिळाले नाही. जुन्या कार्यकर्त्यांना पदे देऊन न्याय देण्याची भूमिका भाजपने स्वीकारली.

See also  राजकीय गुन्हेगारीला धक्का!

अमर साबळे यांना राज्यसभा, सचिन पटवर्धन यांना लोक लेखा समिती, सदाशिव खाडे यांना प्राधिकरणाचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला. उमा खापरे, अमित गोरखे यांना विधानपरिषदेवर घेत पाठबळ दिले. सध्या शहरात भाजपचे चार आमदार असून, भाजप सर्वात मोठा पक्ष झाला. सुरुवातीला महापालिकेतील निर्णय आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्याच कलाने होत होते. मात्र, २०१९ मध्ये चंद्रकांत पाटील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यानंतर त्यांनीही शहरातील राजकारण, महापालिकेतील निर्णय प्रक्रियेत लक्ष घालण्यास सुरुवात केली.

अजित पवार हे भाजपबरोबर आल्यानंतरही पाटील यांनी शहरातील लक्ष कमी होऊ दिले नाही. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा अधिक सक्रिय झाले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांबराेबर बैठक घेतली. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील दौरा करून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. इच्छुकांकडून अर्ज मागविण्याचे आदेश शहरातील पदाधिकाऱ्यांना दिले.

भाजपचा शहरातील प्रबळ विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आहे. त्यामुळे राज्यात युती असली, तरी शहरात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील संघर्ष कायम आहे. त्यातूनच शहर भाजपने स्वबळाचा नारा दिला असून, शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार भाजपने केला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही युतीचा निर्णय स्थानिक गाभा समितीकडे सोपविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शहरात भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे शहरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष अशीच लढाई होईल, असे दिसत आहे.

See also  शनी शिंगणापूरच्या प्रशासक नियुक्तीचा निर्णय रद्द

मागील निवडणुकीत महापालिकेतील सत्ता गेल्याची सल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात आहे. यावेळी महापालिकेत सत्ता आणण्यासाठी पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजप ही युतीबाबत सकारात्मक नसल्याचे दिसून येताच पवार यांनीही स्वबळासाठी तयार राहण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाबरोबर आघाडीची चाचपणी सुरू केली. आघाडी केल्यास काय होईल, याचा अंदाज घेण्याचे आदेश शहराध्यक्ष योगेश बहल यांना दिले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत अजितदादा विरुद्ध भाजपचे चंद्रकांतदादा अशी लढाई होईल, असे दिसू लागले आहे.