तपोवनातील चिन्हांकित १८२५ वृक्षतोडीवरील आक्षेपांना उत्तरे दिली नसताना महापालिकेने शहरात १५ हजार झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. शहराजवळील फाशीचा डोंगर, कानिटकर उद्यान, म्हसरूळ, मखमलाबाद अशा काही ठिकाणी जपानी ‘मियावाकी‘ पद्धतीने रोपांची घनदाट लागवड केली जाणार आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. जनसुनावणीत मांडलेल्या सूचना व आक्षेपांना महापालिका लवकरच उत्तर देणार आहे.
तपोवन परिसरात साधू-महंतांच्या निवास व्यवस्थेसाठी उभारले जाणारे साधुग्राम आणि याच भागात प्रदर्शन केंद्र (माईस प्रकल्प) साकारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तपोवनातील शेकडो झाडे तोडण्याचे यंत्रणेने आधीच निश्चित केल्याची भावना उमटत आहे. मध्यंतरी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी एका झाडाच्या बदल्यात १० झाडे लावली जातील, असे जाहीर केले. तो आधार मानून महापालिकेने तयारी सुरू केली. वृक्षारोपणासाठी शहरात १५ मोकळ्या जागा निश्चित केल्या. या ठिकाणी १५ हजार खड्डे खोदण्याचे काम प्रगतीपथावर आहे. खड्डे खोदण्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. काही ठिकाणी जपानी ‘मियावाकी‘ पद्धतीने म्हणजे कमी जागेत घनदाट वृक्षारोपणाचे नियोजन आहे.
तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीवर गेल्या महिन्यात २४ नोव्हेंबरला सुनावणी झाली होती. यावेळी ८२ वर्षीय ज्येष्ठांपासून, अभ्यासक, वकील, नोकरदार, सामान्य नागरिकांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले म्हणणे मांडले. आजवरच्या कुंभमेळ्यात कधीही वृक्षतोडणी झालेली नाही. सुनावणीत शेकडो जणांनी वृक्षतोडीवर आक्षेप आणि हरकती नोंदविल्या आहेत. अनेकांनी कायदेशीर व तांत्रिक मुद्दे मांडले. त्यावर पुढील चार ते पाच दिवसांत उत्तरे दिली जातील. त्यानंतर वृक्ष प्राधिकरण समिती झाडांबाबत निर्णय घेईल, असे उद्यान विभागाचे प्रमुख विवेक भदाणे यांनी सांगितले
साधुग्राममधील झाडांविषयी वृक्ष प्राधिकरण समितीचा निर्णय अद्याप बाकी आहे. तपोवनातील ज्या झाडांचे स्थलांतर करावे लागेल, ते केले जाईल. कुंभमेळ्यासाठी जी झाडे काढावी लागतील, त्यासाठी १५ हजार झाडांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. अधिक झाडे लागवडीची गरज भासली तर ती सुद्धा केली जाईल. काही ठिकाणी मियावाकी पद्धतीने लागवड केली जाणार आहे. केवळ तपोवन नाही तर शहरातील सर्व भागातील नागरिकांना चांगली हवा मिळेल, अशी व्यवस्था केली जाणार असल्याचे मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी म्हटले आहे.


