“कुस्तीपटू न्याय मागत आहेत, पण भाजपा…”, ‘स्माइल अँबेसिडर’ सचिन तेंडुलकरला राष्ट्रवादीचा खोचक सल्ला

सचिन तेंडुलकरनं पुढच्या पाच वर्षांसाठी या अभियानात स्माइल अँबेसिडरच्या स्वरूपात नियुक्त होण्यास सहमती दर्शवली आहे.

दिग्गज क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरची राज्याच्या स्वच्छ मुख अभियानासाठी महाराष्ट्राचा ‘स्माइल अँबेसिडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारकडून सचिनची ‘स्माइल अँबेसिडर’ म्हणून नियुक्ती करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात आला आहे.

यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी सचिन तेंडुलकरला उद्देशून म्हटलं आहे की, प्रिय सचिन, हे ऐकून आनंद झाला की भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने राज्याच्या ‘स्वच्छ मुख अभियान’साठी ‘स्माइल अँबेसिडर’ म्हणून तुझी नियुक्ती करण्यात आली आहे. पण, तुला माहितीय का, याच भाजपाने त्यांचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना पाठिशी घालत आपल्या कुस्तीपटूंचं हसू हिरावून घेतलं आहे.

हे वाचले का?  Ramiz Raja on Team India: “…म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा धाक निर्माण झाला आहे”, रमीझ राजा यांनी टीम इंडियाचं केलं कौतुक

क्रास्टो यांनी लिहिलं आहे की, सचिन, आपले कुस्तीगीर न्याय मागत आहेत पण भाजपा त्यांच्या खासदाराला वाचवण्यासाठी कुस्तीगीरांच्या आंदोलनाकडे डोळेझाक करत आहे. जसा तू आमचा अभिमान आहेस, तशाच आपल्या देशातील महिला कुस्तीपटूही आमचा अभिमान आहेत. एक खेळाडू म्हणून तू तुझ्या बांधवांना पाठिंबा दिला पाहिजेस, हे आपलं कर्तव्य आहे. आम्हाला आशा आहे की, तू यावर बोलशील आणि आपल्या कुस्तीपटूंचा ‘स्माइल अँबेसिडर’ होशील.