पाच दिवस तापदायक! चाळिशीपार गेलेल्या तापमानात आणखी वाढ होणार, उष्माघाताचे त्रास बळावण्याचा तज्ज्ञांचा इशारा

पंधरा दिवसांहून अधिक काळ राज्यातील अनेक भागांतील कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक आहे.

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रामध्ये वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच पुढील पाच दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्यांत तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा जास्त असून यात आणखी भर पडल्यास उष्माघाताशी संबंधित आरोग्य तक्रारी वाढू शकतील, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. पंधरा दिवसांहून अधिक काळ राज्यातील अनेक भागांतील कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक आहे. पुढील पाच दिवस दोन ते तीन अंशांनी तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भाच्या तुलनेत कमाल तापमान कमी असले तरी आद्र्रतेमुळे कोकण किनारपट्टीवर अधिक उकाडा जाणवत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर किनारपट्टी भागात तापमान वाढीबरोबरच आद्र्रताही वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील  १४ जिल्ह्यांमध्ये बुधवारी ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले. सर्वाधिक (४२.४ अंश सेल्सिअस) तापमानाची नोंद अमरावती आणि वर्धा येथे करण्यात आली.

हे वाचले का?  भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी? श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा निर्धार, “पक्षाला ताकद दाखवणार”

राज्यात उष्माघाताचे रुग्ण दुप्पट

दरम्यान यंदा उष्माघाताच्या रुग्णांमध्येही गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. राज्यात १ मार्च ते १७ मे या कालावधीत १६१६ उष्माघाताच्या संशयित रुग्णांची नोंद झाली. गेल्यावर्षी याच कालावधीत ७६१ रुग्णांची नोंद झाली होती. उष्माघातामुळे सातत्याने शरीराचे निर्जलीकरण होऊन मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठून तीव्र झटका येण्याच्या शक्यता असते. यामुळे व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. मागील महिन्याभरात मुंबईतील प्रत्येक रुग्णालयांमध्ये साधारणपणे ८ ते १० रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

मजूरकामगारांना धोका

उन्हात काम करणारे मजूर, कामगार, दुपारी फिरणाऱ्या तरुणांना ‘सेरेब्रल व्हिनस सायनस थ्रोम्बॉयसिस’चा त्रास दरवर्षी उन्हाळय़ामध्ये कमी अधिक प्रमाणात होतो. मात्र मागील महिनाभरापासून हा त्रास होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. रुग्णालयामध्ये महिनाभरात किमान ७ ते ८ रुग्ण आले असून, त्यातील किमान दोन रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते आहे, अशी माहिती मुंबईतील नायर रुग्णालयातील न्युरोलॉजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. पांडुरंग बारवे यांनी दिली.

हे वाचले का?  सातारा : डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाखांचा दंड

काय होते?

उष्णतेमुळे शरीराची पाणी आणि क्षार बाहेर फेकून तापमान नियंत्रित ठेवण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र पाणी, लिंबू पाणी, विविध पेयांचे सेवन न झाल्यास व्यक्तीच्या शरीराचे निर्जलीकरण होऊन त्याला उष्माघाताचा त्रास होतो. मात्र निर्जलीकरण होण्याची प्रक्रिया सातत्याने होऊ लागल्यास किंवा शरीराची पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील रक्त हळूहळू गरम होऊन घट्ट होते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठून व्यक्तीला तीव्र झटका येण्याची शक्यता असते. या झटक्याला वैद्यकीय भाषेत ‘सेरेब्रल व्हिनस सायनस थ्रोम्बॉयसिस’ असे म्हणतात. हा झटका तीव्र असल्यास व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. मागील महिन्याभरात हा त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात २५ ते ३५ वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. सातत्याने उन्हामध्ये काम करत असल्याने हातापायाला मुंग्या येणे, सतत डोके दुखणे, थकवा वाढणे अशी लक्षणे दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी माहिती कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाचे क्रिटिकल केअर विभागाचे संचालक डॉ. भरत जगियासी यांनी दिली.

हे वाचले का?  अहमदनगरची अक्षता जाधव अबॅकस परीक्षेमध्ये राज्यात दुसरी

उष्माघाताचे रुग्ण

अमरावती : ७९, औरंगाबाद : १०, भंडारा, वाशीम, पालघर : २,

बुलढाणा : १६ , चंद्रपूर : ९२,  गडचिरोली : ९, जळगाव : ३३,  जालना : ५, लातूर : ९५,

मुंबई उपनगर : १५५  नागपूर : ६६  नांदेड : ५३, नंदुरबार : ११३, 

नाशिक : २४  उस्मानाबाद : ३७,

पुणे :१८, रायगड : ४०७,

रत्नागिरी : ८, सांगली : ६, सातारा : २६,  सोलापूर : ९१, ठाणे : ४०, वर्धा : १६७  यवतमाळ : १५६