‘समृद्धी’च्या दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती

समृद्धी महामार्गाचा हा दुसरा टप्पा म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा मानिबदू ठरेल, असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.

राहाता : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डीजवळील कोकमठाण येथे होत आहे. समृद्धी महामार्गाचा हा दुसरा टप्पा म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा मानिबदू ठरेल, असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला. पश्चिम व उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला जोडला जाणारा विकासाचा सुवर्ण त्रिकोण ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे वाचले का?  सांगली जिल्ह्यातील ७९ गावांत ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम, यावर्षी नव्या २२ गावांची भर

समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले होते. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचण्याचा सुखद अनुभव सर्वाना मिळाला. आता या महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी अडीचला शिर्डीजवळील कोकमठाण इंटरचेंज येथे होत आहे.

या मार्गामुळे गती मिळेल असे सांगून मंत्री विखे म्हणाले, की पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडी सुरू झाली. आता समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचीही होत असलेली सुरुवात ही जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब ठरेल. दुसऱ्या टप्प्यातील या महामार्गाचा लाभ नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यासह मोठय़ा भागास होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाची पुण्या-मुंबईकडील वाहतूकही अतिशय कमी वेळात होईल. यामुळे कृषी उद्योगासह इतर उद्योग, व्यवसायांनाही चालना मिळून रोजगारवृद्धीच्या दृष्टीने या महामार्गावरील दळणवळण उपयुक्त ठरणार आहे. भविष्यात लवकरच या भागात लॉजेस्टिक पार्क, आयटी पार्क आणि शेतीपूरक उद्योगाच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठीसुद्धा समृद्धी महामार्गाचे मोठे सहकार्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचले का?  शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता