सावरकरांची मानसिकता गुलामगिरी सहन न करण्याची, पंतप्रधान मोदींचे ‘मन की बात’मध्ये गौरवोद्गार

‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे निर्भय वृत्तीचे आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व होते. गुलामगिरी कदापिही मान्य नसलेली त्यांची मानसिकता होती,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले.

पीटीआय, नवी दिल्ली : ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे निर्भय वृत्तीचे आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व होते. गुलामगिरी कदापिही मान्य नसलेली त्यांची मानसिकता होती,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले. ‘मन की बात’ या  संवादसत्रात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन केले.

हे वाचले का?  दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज

मोदी म्हणाले, की आज २८ मे. थोर स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांची जयंती. सावरकरांचे बलिदान, धैर्य आणि दृढनिश्चय आपल्याला सतत प्रेरणा देत राहील. त्यांच्या पराक्रमाच्या कथा, धैर्य आणि संकल्प आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी आहे. वीर सावरकरांना ज्या अंदमानातील कोठडीत अनेक वर्षे ठेवले होते, त्यांनी काळय़ा पाण्याची खडतर शिक्षा भोगली होती, तेथे मी भेट दिली. तो दिवस मी कधीही विसरू शकणार नाही.

हे वाचले का?  पूर्व लडाखमध्ये सैन्यमाघारी पूर्ण, भारत-चीन सैनिकांमध्ये आज दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण

मोदींनी सांगितले, की सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वात विशाल सामर्थ्यांचे दर्शन घडते. त्यांचा  निडर आणि स्वाभिमानी स्वभाव गुलामगिरीची मानसिकता अजिबात सहन करू शकला नाही. केवळ स्वातंत्र्य चळवळीतच नव्हे तर सावरकरांनी सामाजिक समता आणि सामाजिक न्यायासाठी अविस्मरणीय योगदान दिले. रविवारी सावरकर जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी जुन्या संसद भवनातील मध्यवर्ती सभागृहात सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर