“बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर…”; वंचितच्या मविआतील प्रवेशाबाबत सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

सुषमा अंधारे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होणार की नाही याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. मागील काही दिवसांपासून वंचितचा कधी काँग्रेसबरोबर, कधी राष्ट्रवादीबरोबर तर कधी ठाकरे गटातील खासदार संजय राऊतांबरोबर संघर्ष पाहायला मिळतो आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हे वाचले का?  ‘समृद्धी’च्या वाटेवर औद्योगिक विकासाची गरज

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत येताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) आणि शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) यांच्या पालखीचे भोई होऊ नये, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आणि विचार भारतात आणि महाराष्ट्राचा रुजवायचा असेल, तर त्या विचारधारेवर चालणाऱ्या कोणताही पक्षाने महाविकास आघाडीबरोबर यावं, वंचित बहुजन आघाडीकडेही आम्ही त्याच भूमिकेतून बघतो आहे, असेही त्या म्हणाल्या.

लोकसभा निवडणूक लढण्याची चर्चा, सुषमा अंधारे म्हणाल्या..

सुषमा अंधारे या लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नाही. तसेच कल्याण लोकसभेच्या जागेसाठी दोन ते तीन दिवसात उमेदवार जाहीर केला जाईल, असे त्या म्हणाल्या.

हे वाचले का?  Shiv Jayanti 2024 ‘शिवरायांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध,’ मुख्यमंत्र्यांचे शिवनेरी येथील सोहळ्यात उद्गार

वंचितच्या मविआतील सहभागाबाबत साशंकता

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने जागावाटपासाठी ठेवलेल्या अटी लक्षात घेता ते महाविकास आघाडीत सहभागी होतील की नाही, याबाबत साशंकता आहे. महाविकास आघाडीला वंचितने २७ जागांवर आम्ही लढण्याची तयारी केल्याचे पत्र दिले आहे. प्रत्यक्ष किती जागा पाहिजेत याची मागणी केलेली नसली तरी २७ जागांचा प्रस्ताव देऊन फक्त दोन-तीन जागा स्वीकारणार नाही हा सूचक संदेश दिला आहे.