World Cup 2023 :पारंपरिक प्रतिस्पर्ध्यातील क्रिकेटद्वंद्वाची पर्वणी! आज भारत-पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकाच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यातील सामन्यांतून अनेक नायक व खलनायक तयार झाले आहेत.

संदीप कदम

अहमदाबाद : रोहित शर्माचा संयम, विराट कोहलीची आक्रमकता आणि जसप्रीत बुमरामधील प्रभावी माऱ्याची क्षमता यामुळे एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज, शनिवारी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाचे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध पारडे जड मानले जात आहे.

या सामन्याला सामाजिक आणि राजकीय संदर्भ असल्याने क्रिकेटच्या २२ यार्डाच्या खेळपट्टीवरही याचा प्रभाव जाणवेल. भारतीय संघ कागदावर मजबूत संघ दिसत आहे आणि फलंदाजी फळीत तारांकितांचा भरणा आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या दृष्टीने वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा पहिला ‘स्पेल’ संघासाठी निर्णायक ठरेल.

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यातील सामन्यांतून अनेक नायक व खलनायक तयार झाले आहेत. जावेद मियांदाद आणि चेतन शर्मा, सलीम मलिक आणि मिनदर सिंग, अजय जडेजा आणि वकार युनिस, ऋषिकेश कानिटकर आणि सकलेन मुश्ताक, सचिन तेंडुलकर आणि शोएब अख्तर, विराट कोहली आणि वहाब रियाझ, जोगिंदर शर्मा आणि मिस्बा-उल-हक (ट्वेन्टी-२० विश्वचषकात) या खेळाडूंमधील द्वंद्व आजही सर्व क्रिकेटरसिकांच्या लक्षात आहे. सध्याच्या संघातील खेळाडूही चमकदार कामगिरी करत नायक म्हणून उदयास येण्यास उत्सुक असतील.

आक्रमक सुरुवातीची अपेक्षा

* भारतीय कर्णधार रोहित शर्मा एक लाख ३२ हजार चाहत्यांसमोर शाहीनविरुद्ध आक्रमक खेळ करण्याच्या प्रयत्नात असेल. शुभमन गिल डेंग्यूतून सावरला असला, तरी त्याला या सामन्यात संधी मिळते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हे वाचले का?  Ranji Trophy 2024 Final : मुशीर खानचे ३ महिन्यांत चौथे शतक, सचिन तेंडुलकरचा मोडला ‘हा’ खास विक्रम

* रोहितला विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांसारख्या खेळाडूंकडून चांगल्या सहकार्याची अपेक्षा असेल.

* पाकिस्तानच्या फिरकीपटूंची कामगिरी सुमार ठरली आहे. उपकर्णधार व लेग-स्पिनर शादाब खानने दोन सामन्यांत १६ षटकांत १०० धावा दिल्या आहेत.

कुलदीपबाबर आमनेसामने

* मोहम्मद रिझवानने श्रीलंकेविरुद्ध शतकी खेळी केली होती आणि त्याला मोलाची साथ देत अब्दुल्ला शफिकने आपली क्षमता दाखवून दिली. सौद शकीलकडे सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता आहे.

* पाकिस्तान फलंदाजी करत असताना सर्वांचे लक्ष कर्णधार बाबर आझमवर असेल. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव व बाबर यांच्यातील द्वंद्व पाहण्यासारखे असेल.

* कुलदीपने आपल्या चायनामन गोलंदाजीने २०१९मध्ये मँचेस्टर येथे बाबरला अडचणीत आणले होते. कुलदीपने मधल्या काळात लय गमावली होती. मात्र, आता त्याला सूर गवसला असून तो बाबरच्या अडचणी वाढवू शकेल.

* त्यापूर्वी पाकिस्तानला जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागेल. रिझवान आणि शफिक यांना बुमरा व सिराजविरुद्ध धावा करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.

विजयाची मालिका राखणार?

भारत-पाकिस्तान सामन्यांसाठी ‘युद्ध’, ‘परतफेड’ अशा शब्दांचा प्रयोग करण्याबाबत महेंद्रसिंह धोनीने आक्षेप  घेतला. मात्र, या सामन्याकडे दोन्ही देशांतीलच नाही, तर जगभरातील चाहत्यांचे लक्ष असते. अनेकदा विश्वचषकाच्या अंतिम लढतीपेक्षाही या सामन्याला महत्त्व असते. विश्वचषकात भारत व पाकिस्तान यांच्यातील सर्व सामने एकतर्फीच राहिल्याचे चित्र आहे. सामन्याचा निकाल सोडल्यास या लढती वेगवेगळय़ा गोष्टींसाठी लक्षात राहतात. मियांदादने १९९२मध्ये सिडनीमध्ये किरण मोरेची थट्टा करणे, वेंकटेश प्रसादचा आमिर सोहेलवर राग व्यक्त करणे, सेंच्युरियन येथे हरभजन सिंग व मोहम्मद युसूफ यांच्यातील वाद, हे प्रसंग आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. एकदिवसीय विश्वचषकात उभय संघांत झालेल्या सात सामन्यांत भारत विजयी ठरला आहे. भारताने आपली विजयांची मालिका कायम राखल्यास संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण असेल हे निश्चित.

हे वाचले का?  सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंडय़ा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

पाकिस्तान :  बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफिक, मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाझ, उसामा मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद वसीम.

भारतासमोर रविचंद्रन अश्विन आणि शार्दूल ठाकूरपैकी कोणाची निवड करायची हा प्रश्न आहे. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्यास शार्दूलला संधी मिळू शकेल आणि चेंडू थांबून आल्यास अश्विनचा पर्याय योग्य असेल.

हे वाचले का?  दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी? नेत्यांच्या विधानांमुळे तर्क-वितर्कांना उधाण; केजरीवालांच्या अटकेमुळे परिस्थिती चिघळणार?

गिल सामन्यासाठी उपलब्ध असण्याची शक्यता ९९ टक्क्यांपर्यंत आहे. तुम्हाला सामना जिंकायचा झाल्यास त्यादिवशी चांगला खेळ करावा लागतो आणि आमचे लक्ष त्याच्यावरच आहे. परिस्थितीनुसार चांगला खेळ करणे हे महत्त्वाचे असते. घरच्या चाहत्यांसमोर खेळताना नेहमीच चांगले वाटते. भारताबाहेरही आम्हाला चाहत्यांचा असाच पाठिंबा मिळत आला आहे. घरच्या मैदानावर खेळताना चाहत्यांकडून मिळणारा पाठिंबा भारतासाठी नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. मात्र, विजय मिळवायचा झाल्यास चांगले क्रिकेट खेळण्याशिवाय पर्याय नसतो. – रोहित शर्माभारताचा कर्णधार

’वेळ : दु. २ वा. ’थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)