सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Simhastha Kumbhmela) नाशिक आणि त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) येथे येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर व्हावा, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन प्रभावीपणे करता यावे आणि आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उभ्या राहाव्यात, यासाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. पार्किंगची ठिकाणे, वाहतुकीचे मार्ग, दिशादर्शक फलक, साधुग्राममधील पायाभूत सुविधा तसेच घाट विकासाच्या कामांचा आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.
पालक सचिव तथा जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले (Eknath Dawale) यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ही बैठक कुंभमेळा प्राधिकरणात झाली. बैठकीत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, वन विभाग, आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसह विविध यंत्रणांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.
कुंभमेळ्याच्या (Kumbhmela) पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आपापल्या कामांचे नियोजन एकमेकांशी समन्वय साधून करावे, कामांच्या सद्यःस्थितीची अद्ययावत माहिती ठेवावी आणि प्रलंबित मान्यता व तांत्रिक अडचणी वेळेत सोडवाव्यात, असे निर्देश डवले यांनी दिले. विविध यंत्रणांशी संबंधित विषयांवर निर्णय घेण्यास विलंब होणार नाही, यासाठी आवश्यक समन्वय आणि पाठपुरावा करण्यावर त्यांनी भर दिला.
